सुपगावच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी हजर…शिक्षक गैरहजर..!
शाळा उघडली, मात्र एकही शिक्षक उपस्थित नसल्याने ग्रामस्थ संतप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज (दि.२९ ऑगस्ट) संतापदायक प्रकार समोर आला. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेत चार शिक्षक कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आज सकाळी विद्यार्थी शाळेत पोहोचल्यानंतर एकही शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांविना शाळेत बसण्याची वेळ आली.
दरम्यान, शाळेतील शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शाळा उघडली, मात्र शिक्षकच उपस्थित नसल्याचे समोर आले. सकाळी विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतरही शिक्षक न आल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
शिक्षकांच्या अनुपस्थितीची माहिती ग्रामस्थांना होताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित असलेल्या शाळेत शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहणे अपेक्षित असताना एकही शिक्षक शाळेत उपस्थित नसणे ही बाब गंभीर असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शिक्षकांच्या अनुपस्थितीबाबत प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षकांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे
शाळेत विद्यार्थी उपस्थित, पोषण आहाराची तयारी सुरू; मात्र शिक्षकच गायब असल्याने शिक्षण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराची शिक्षण विभागाकडून दखल घेतली जाणार का आणि संबंधित शिक्षकांवर काय कारवाई केली जाणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मी आज सुट्टीवर असल्याने, मला या प्रकाराबद्दल काहीही माहिती नाही. सोमवारला शाळेत आल्यावर माहिती घेऊन सांगतो.
_आनंद कोठेवाड, मुख्याध्यापक
सुपगाव येथील शाळेमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली असून, सोमवारला ३.०० वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे.
_संजय नैताम,गटविकास अधिकारी गोंडपिपरी.



