राखीच्या धाग्याने जुळले माणुसकीचे बंध; बंदी बांधव झाले भावूक
चंद्रपूर जिल्हा कारागृहात रोटरी व आयएफआरएम क्लब तर्फे रक्षाबंधन, भावगीतांचा सुरेल नजराणा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ कारागृहातील बंदी बांधवांनाही सण-उत्सवांच्या माध्यमातून आपुलकीचा आणि माणुसकीचा स्पर्श मिळावा, या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा कारागृहात रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरियन म्युझिशियन (IFRM), चंद्रपूर यांच्या वतीने रक्षाबंधन व भावगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लबच्या महिला सदस्यांनी बंदी बांधवांना राखी बांधताच अनेक जण भावूक झाले. त्यानंतर सादर झालेल्या मराठी व हिंदी भावगीतांनी वातावरणात आनंद, चैतन्य आणि भावनांची उधळण केली.
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर २८ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे होते. प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हिल क्लब ऑफ चंद्रपूरच्या माजी अध्यक्षा अर्चना उचके, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे माजी अध्यक्ष संदीप रामटेके उपस्थित होते. वरिष्ठ तुरुंगाधिकारी मिलिंद बनसोड, कमलाकर मिराशे, शिक्षक संजीव हटवादे, तसेच संस्थेच्या सदस्या डॉ.आसावरी देवतळे यांच्यासह अन्य मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व आयएफआरएम क्लबच्या महिला सदस्यांनी बंदी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या वेळी राखी बांधताना अनेक बंदी बांधवांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू तरळले.
कारागृहाच्या भिंतींआडही जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते जपता येते, याचा प्रत्यय या प्रसंगी आला. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासोबतच आयएफआरएम चंद्रपूरच्या कलाकारांनी सप्तसुरांची मैफल रंगवली. विविध रागांतील सुमधुर मराठी व हिंदी गीतांचा नजराणा सादर करत कलाकारांनी बंदी बांधवांची मने जिंकली. श्रीमती मनीषा पडगिलवार यांनी ‘सूरज की गर्मी से तपते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. डॉ. सुनील मलोजवार आणि जितेंद्र जनबंधु यांनी ‘तुझमें रब दिखता है, यारा मैं क्या करूँ’ हे गीत सादर केले. यानंतर ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’, ‘मेरे प्यार की उमर हो इतनी सनम’, ‘फूलों का तारों का, सबका कहना है’, ‘गजब का है दिन, सोचो जरा’ आदी लोकप्रिय गीतांनी कार्यक्रमात रंग भरला.
मनीषा पडगिलवार, वृषाली डेकाटे, पल्लवी चंदावार, नीता जनबंधु, ज्योती रामटेके, राजेश गन्नारपवार, मनीष बोराडे, कमलाकर मिराशे आणि संदीप जोशी आदी कलाकारांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची दाद मिळवली. अध्यक्षीय भाषणात कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी बंदी बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘हेही दिवस निघून जातील, चांगले दिवस येतील,’ असा आशावादी संदेश देत त्यांनी बंदी बांधवांना सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी मिलिंद बनसोड, कमलाकर मिराशे, शिक्षक संजीव हटवादे, सुभेदार महेंद्र हिरोळे, सुभेदार शिवशंकर खंडारे, हवालदार नरेंद्र दशमवार, कारागृह शिपाई परेश जगनाडे, स्वाती सहारे, प्रगती बानेवार तसेच अन्य कारागृह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्का ठाकरे यांनी केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बांधलेला राखीचा धागा आणि त्यानंतर रंगलेली सुरेल गीतांची मैफल यामुळे कारागृहातील वातावरण काही काळासाठी भावनिक, प्रसन्न आणि आपुलकीने भारावून गेले. या उपक्रमातून ‘कारागृहाच्या भिंती माणसांमध्ये अंतर निर्माण करू शकतात; मात्र माणुसकीच्या भावना रोखू शकत नाहीत,’ हा संदेश अधोरेखित झाला.



