कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा..!
सात माजी विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षकपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
स्थानिक स्व. लक्ष्मणराव ज. कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर यश संपादन करत प्राथमिक शिक्षक व शिक्षिका म्हणून निवड मिळवली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
सत्र २०२०-२२ मधील महाविद्यालयाचे अत्यंत हुशार, प्रामाणिक, होतकरू व मेहनती विद्यार्थी रितिक पोटे आणि अश्विनी येलमुले यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली आहे.
तसेच सत्र २०२१-२२ या बॅचमधील सुप्रिया पुलगमकर, अश्विनी ढवस, स्नेहल हिवरकर, उज्ज्वला बामनकार आणि पल्लवी कोले यांचीही प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या सात माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकपदाच्या माध्यमातून आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या, मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर शिक्षक म्हणून यशस्वी प्रवेश मिळवणे ही महाविद्यालयासाठी निश्चितच अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरातही त्यांचे कौतुक होत आहे.
“शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे,” या विचाराला सार्थ ठरवत माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश आगामी विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.



