ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अडेगाव येथील युवकाचा ट्रान्सफॉर्मरवर करंट लागून मृत्यू

राजेंद्रच्या मृत्यूस जबाबदार कोण.? ; दोषीवर कारवाईची मागणी

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील राजेंद्र डहाले (वय ३२) या युवकाचा गावालगतच्या रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरवर विद्युतचे काम करीत असताना करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून, राजेंद्र डहाले हा विद्युत विभागाचा अधिकृत कर्मचारी नसताना त्याला ट्रान्सफॉर्मरवर विद्युत काम करण्यासाठी नेमके कोणी आणि का पाठविले, असा संतप्त सवाल अडेगाववासीय करीत आहेत.

  शेतकऱ्याच्या शेतात विद्युत पुरवठा नसल्यासंदर्भात विद्युत विभागाकडून सूचना मिळाल्यानंतर राजेंद्र डहाले हा युवक संबंधित ट्रान्सफॉर्मरवर विद्युत काम करण्यासाठी गेला होता. मात्र, तो विद्युत विभागाचा कर्मचारी नसताना त्याच्याकडून एवढे धोकादायक काम करून घेण्याची वेळ का आली, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

विद्युत वाहिन्या व ट्रान्सफॉर्मरवरील काम अत्यंत धोकादायक स्वरूपाचे असते. अशा कामासाठी प्रशिक्षित व अधिकृत विद्युत कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. असे असताना राजेंद्र डहाले याला कोणाच्या सांगण्यावरून कामासाठी पाठविण्यात आले, त्याला काम करण्याची परवानगी कोणी दिली आणि त्यावेळी विद्युत विभागाचा एकही अधिकृत कर्मचारी घटनास्थळी का उपस्थित नव्हता, असे अनेक प्रश्न अडेगाववासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

राजेंद्र डहाले याच्या मृत्यूस कारणीभूत परिस्थितीची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. , विद्युत विभागाचा कर्मचारी नसलेल्या युवकाला विद्युत ट्रान्सफॉर्मरवर काम करण्यासाठी पाठविण्यामागे कोणाची जबाबदारी होती, याची चौकशी करून संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

चौकशीत निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल काय, असा सवालही अडेगाववासीयांनी उपस्थित केला आहे. राजेंद्र डहाले यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे

लाईनमेन कडे कोणत्याही शेतकऱ्यांची विद्युत पुरवठा बंद असल्याची तक्रार प्राप्त नाही व माझे कडे सुद्धा नाही. परंतु सदर इसम ट्रांसफार्मर वर काम करण्याकरिता का गेला, हे अजून पर्यंत आम्हालाही समजले नाही.

     *अभिषेक जनगावे, अभियंता, विद्युत पुरवठा विभाग गोंडपिपरी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये