ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका : मोठ्या आवाजात डीजे वाजविणे पडले महागात

नियम धाब्यावर बसविणाऱ्या डीजे ऑपरेटरवर कारवाई : ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              विनापरवाना तसेच मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई केली. नागपूर रोडवरील जमघट हॉटेलसमोरील खुल्या मैदानात मोठ्या आवाजात डीजे वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या डीजे ऑपरेटरवर कारवाई करीत पोलिसांनी तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमघट हॉटेल, नागपूर रोड, भद्रावतीसमोरील खुल्या मैदानात मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रावती पोलीस ठाण्याच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी डीजेचा कर्णकर्कश आवाज सुरू असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी डीजे ऑपरेटरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव लोकेश दिलीप दुधे (वय १८ वर्षे, रा. गुरुनगर हॅप्पी प्लॉट, भद्रावती) असे सांगितले. डीजे वाजविण्यासाठी कायदेशीर परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले.

३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी कारवाईदरम्यान खालील मुद्देमाल जप्त केला—

डीजे कॅबिनेट बॉक्स – ४ नग : ₹६० हजार

गँगस्टर कंपनीचे अॅम्प्लिफायर मशीन – २ नग : ₹३ लाख

एकूण जप्त मुद्देमाल : ₹३ लाख ६० हजार

विनापरवाना डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग तसेच ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३६(२) व १३६ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून जप्त मुद्देमाल भद्रावती पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

‘डीजे’च्या दणदणाटाला पोलिसांचा लगाम

सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी घेतलेल्या या कारवाईमुळे नियम धाब्यावर बसविणाऱ्या डीजे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने होणे गरजेचे आहे.

पोलिस पथकाची कारवाई

ही कारवाई प्रभारी पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस ठाण्याच्या पथकातील पोलीस हवालदार प्रशांत पुंडलिक शेंडे, सहायक फौजदार बंटी बेसरकर, पोलीस हवालदार विजय तलांडे आणि पोलीस शिपाई प्रेम बावणकर यांनी केली.

विनापरवाना डीजे, कर्णकर्कश आवाज आणि ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांनी उगारलेला हा दणका आगामी काळातही कायम राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये