गोंडपिपरी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली विजय वडेट्टीवारांची भेट
_एमआयडीसी प्रश्नासह विविध समस्यांवर सविस्तर चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने तालुक्याचे सुपुत्र तथा ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी गोंडपिपरी परिसरातील प्रस्तावित एमआयडीसीचा मुद्दा, १३ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न तसेच तालुक्यातील विविध सामाजिक, प्रशासकीय आणि विकासाशी संबंधित समस्या पत्रकारांनी वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
शिष्टमंडळाच्या वतीने विजय वडेट्टीवार यांचा गोंडपिपरीचे सुपुत्र म्हणून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी तालुक्यातील सद्यस्थिती, प्रस्तावित एमआयडीसीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती त्यांना दिली.
पत्रकारांनी १३ गावांतील शेतकऱ्यांच्या भावना, त्यांच्या मागण्या तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती वडेट्टीवार यांच्या समोर मांडली. यासोबतच गोंडपिपरी तालुक्यातील विविध मूलभूत प्रश्न, विकासकामांतील अडचणी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली.
पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी एमआयडीसी प्रश्नासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात आपण त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ आंदोलनाच्या पातळीवरच नव्हे, तर न्यायालयीन लढ्यातही शेतकऱ्यांच्या बाजूने उत्तम वकील उभे केले असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
प्रस्तावित एमआयडीसीच्या प्रश्नामुळे प्रभावित होणाऱ्या १३ गावांतील शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुढील काळात या प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या लढ्यात सक्रियपणे साथ देत असल्याचा त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान गोंडपिपरीच्या विकासाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यावर प्रभावी पाठपुरावा व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. पत्रकारांच्या शिष्टमंडळात महेंद्र कुनघाडकर, संदीप रायपुरे, समीर निमगडे, प्रमोद दुर्गे, प्रसेंजित डोंगरे, राजेश डोंगरे, विनोद धोडरे इत्यादी उपस्थित होते.



