सर्पदंशाने बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
इंजाळा : शेतात बांधून ठेवलेल्या बैलाला सर्पदंश झाल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी, दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजताच्या सुमारास मौजा इंजाळा येथील शेतात घडली.
शेतकरी किशोर वामनराव मुटे यांच्या शेत सर्वे क्रमांक 223 मध्ये हा प्रकार घडला. शेतीच्या कामासाठी बैल शेतात बांधून ठेवण्यात आला होता. दरम्यान, त्याला सर्पदंश झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतीची कामेही खोळंबली आहेत.
बैल हा शेतकऱ्याच्या शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अचानक झालेल्या या घटनेचा मोठा आर्थिक व मानसिक फटका शेतकरी किशोर मुडे यांना बसला आहे. त्यांच्या कुटुंबावरही संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने घटनेची दखल घेऊन पंचनामा करावा तसेच नियमानुसार शेतकऱ्याला नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून शेतकऱ्याला योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



