देऊळगाव महीत एकाच रात्री चार घरांत चोऱ्या; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास
कपाट फोडून रोकड, सोन्याची अंगठी अन् चांदीचे नाणे लंपास; देऊळगाव महीत चोरट्यांचा धुमाकूळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडून तब्बल १ लाख ६५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. १० ऑगस्टच्या सायंकाळपासून ११ ऑगस्टच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी झिपा चव्हाण (वय ६६, सेवानिवृत्त एसटी कर्मचारी, रा. देऊळगाव मही) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. घरातील कपाटाची पाहणी करून चोरट्याने त्यातील ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली.
त्यानंतर चोरट्याने परिसरातील इतर घरांनाही लक्ष्य केले. शिवाजी रमेश म्हस्के यांच्या घरातून १० हजार रुपयांची रोकड तसेच अर्ध्या ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे ७ हजार रुपये किमतीची, चोरीला गेली.
याच परिसरातील सुभाष भगवान इंगळे यांच्या घरातून ३५ हजार रुपयांची रोकड आणि १५ ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे, अंदाजे ३ हजार ५०० रुपये किमतीचे, चोरट्याने लंपास केले.
चोरट्याने ज्ञानेश्वर सौंदाजी बुधवत यांच्या घरालाही लक्ष्य केले. घरातील लहान मुलांचा गल्ला फोडून त्यातील अंदाजे ५ हजार रुपये तसेच कपाटातील १५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली.
अशाप्रकारे अज्ञात चोरट्याने चार घरांतून एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांची रोकड व सोन्या-चांदीच्या वस्तू चोरून नेल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी शिवाजी झिपा चव्हाण यांच्या तोंडी फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक ३६८/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) आणि ३३१(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. चोरट्याचा माग काढण्यासाठी परिसरातील हालचाली, घटनास्थळावरील परिस्थिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहोळकर करीत आहेत. एकाच रात्री चार घरे लक्ष्य करण्यात आल्याने पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपासाला वेग दिला आहे..



