शेणगाव आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरा
सय्यद शब्बीर जागीरदार यांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेणगाव येथील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक औषधांसह सर्पदंशावरील औषधे व आपत्कालीन उपचाराची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, अशी जोरदार मागणी पत्रकार संरक्षण संघाचे विदर्भ अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी – १, औषध निर्माण अधिकारी – १, परिचर – २, आरोग्य सेवक – २ तसेच सुमन योजना अंतर्गत अधिपरिचारिका – २ अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. याशिवाय उपकेंद्र कुंभेझरी व टेकामांडवा येथे प्रत्येकी एक आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. त्यामुळे या दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
पावसाळ्यात ताप, मलेरिया, डेंग्यू, सर्पदंश तसेच विषारी जीव-जंतूंच्या दंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने उपलब्ध आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच विषारी जीवाच्या दंशामुळे पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सर्पदंशावरील आवश्यक औषधे, जीवनावश्यक औषधांचा पुरेसा साठा, लसीकरणासाठी आवश्यक साहित्य तसेच आपत्कालीन उपचाराची साधने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सदैव उपलब्ध ठेवावीत, अशी मागणीही जागीरदार यांनी केली आहे.
अतिदुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील महत्त्वाची पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे ही गंभीर बाब असून, जिल्हा आरोग्य प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे सय्यद शब्बीर जागीरदार यांनी म्हटले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची तातडीने पाहणी करून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी, औषधसाठा व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि जिवती तालुक्यातील आदिवासी नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा द्यावी. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सय्यद शब्बीर जागीरदार यांनी दिला आहे.



