ज्ञान, करिअर आणि कौशल्य विकासाचा संगम
आर.सी.ई.आर.टी.मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला योग्य दिशा देण्यासोबतच त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध संधींची ओळख करून देण्याच्या उद्देशाने सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट ) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आर.सी.ई.आर.टी.), चंद्रपूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने दि. ७ व ८ ऑगस्ट २०२६ रोजी सेमिनार हॉलमध्ये तृतीय सत्रातील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाची माहिती न देता त्यांच्या तांत्रिक ज्ञानासोबत करिअरविषयक जाण, व्यावसायिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक टप्प्यासाठी तयार करणे आणि उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे मुख्य संरक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. झेड. चिताडे होते. उद्घाटनप्रसंगी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक प्रा. एस. एन. कुलकर्णी यांनी प्राचार्यांचे स्वागत केले. यावेळी प्रा. वाय. डी. परिहार उपस्थित होते.
डॉ. चिताडे सर, यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभियांत्रिकी शिक्षणाकडे केवळ परीक्षा आणि अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून न पाहता ज्ञान, कौशल्य आणि अनुभव मिळविण्याची संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले. तांत्रिक क्षमतेसोबत संवादकौशल्य, शिस्त, सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि विविध उपक्रमांमध्ये सहभाग यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आपल्या भविष्यातील वाटचालीची दिशा ठरविण्यास प्रेरणा मिळाली.
तृतीय सत्रातील अभ्यासक्रम, विषयांची रूपरेषा व शैक्षणिक अपेक्षांची माहिती प्रा. एस. आर. मारवे व प्रा. एस. जी. पडिशालवार, सहाय्यक प्राध्यापक यांनी दिली. प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या श्रीमती स्तुती साने यांनी करिअर मार्गदर्शन सत्रातून विद्यार्थ्यांना पुढील तयारी, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक कौशल्यांची माहिती दिली. प्रा. एन. जे. गेडाम यांनी विद्यार्थी मेंटरिंग व विद्यार्थी विकासाशी संबंधित उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रा. सी. डी. कारेकर, सहाय्यक प्राध्यापक यांनी विविध विद्यार्थी उपक्रम तसेच व्यावसायिक संस्था व संबंधित निकायांशी विद्यार्थ्यांच्या असलेल्या संलग्नतेबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना विभागातील विविध प्रयोगशाळांना भेट देण्यात आली. या वेळी प्रायोगिक शिक्षणाच्या सुविधा, उपलब्ध उपकरणे आणि प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यामुळे वर्गात शिकलेल्या संकल्पनांचा प्रात्यक्षिक कामाशी संबंध जोडण्यास विद्यार्थ्यांना मदत झाली.
कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन प्रा. एस. एन. गलवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. आफरीन खान यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
दोन दिवसीय कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या शैक्षणिक गरजा समजून घेणे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक दिशा व संधींची माहिती करून देणे हा होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक विकासासाठी विभाग आणि संस्थेची असलेली बांधिलकी अधोरेखित झाली.



