विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या झारखंड सरकारचा कमल स्पोर्टिंग क्लबद्वारा निषेध
सरकारने दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा- रघुवीर अहीर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- झारखंडमध्ये परीक्षा व भरती प्रक्रियेत पारदर्शकता, रोजगाराच्या संधी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या झेन-जी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा विद्यार्थी व युवकांच्या न्याय हक्कांसाठी संवेदनशील असलेल्या कमल स्पोर्टिंग क्लब चंद्रपूर द्वारा तीव्र निषेध नोंदवून झारखंड सरकारने संवादातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सोडवणूक करावी अशी भूमिका क्लबचे जिल्हाध्यक्ष युवा नेते रघुवीर अहीर यांनी व्यक्त केली.
शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांची प्रतारणा आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने संवाद साधत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावणे हीच खरी लोकशाही आहे.
रोजगार आणि पारदर्शक भरती प्रक्रियेची मागणी करणारे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत. परीक्षा व भरती प्रक्रियेत पारदर्शकता असावी, गैरप्रकारांना आळा बसावा आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ही त्यांची रास्त मागणी आहे. अशा मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्याऐवजी त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर ठोस तोडगा काढणे अपेक्षित असताना झारखंड सरकारने दडपशाही अनुसरली हे निषेधार्ह आहे. भरती परीक्षांतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी किंवा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व रोजगाराचे भविष्य या प्रक्रियांवर अवलंबून असल्याने भरती व्यवस्थेत विश्वासार्हता आणि पारदर्शकता कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे.
लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन आणि आपल्या मागण्या मांडणे हा नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे. त्याचा आदर केला गेला पाहिजे. लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणीही या विशेष आंदोलनातून करण्यात आली.
कमल स्पोर्टिंग क्लबचे कार्यकर्ते व स्थानिक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. 13 ऑगस्ट रोजी एकत्र येत झारखंड सरकारच्या हुकुमशाही कृतीचा बॅनर झडकवीत तीव्र निषेध नोंदविला. रघुवीर अहीर यांच्या नेतृत्वात झालेल्या या निषेध आंदोलनामध्ये मयूर भोकरे, सलीम शेख, पराग मलोडे, अन्जया मातंगी, तेजस सुंचूवार, अभिनव कोरकोपुल्ला, साई कोटा, ईश्वर वाघमारे, पवन पुरेली, राहुल सूर्यवंशी आणि सुबोध चिकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.



