स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत सेवा संकल्प अभियानाचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा : पंचायत समिती कोरपना, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ‘स्वच्छता दूत महाराष्ट्र’ या उपक्रमाचे आयोजन श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नांदा येथे करण्यात आले. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व विशद करताना स्वच्छता ही केवळ शासनाची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकी आहे, असे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.अनिल मुसळे होते. सदगुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री.माधव चिंतमवाड, पंचायत समिती कोरपना उपस्थित होते. तसेच गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश शेंडे, केंद्रप्रमुख श्री. पंढरी मुसळे आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नांदा येथील तुम्मे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना स्वच्छ परिसरामुळे आरोग्यदायी जीवनशैली निर्माण होते. कचऱ्याची योग्य विल्हेवाट, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या छोट्या-छोट्या कृतींमधून मोठा सामाजिक बदल घडवून आणता येतो, असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून त्या कुटुंबात व समाजात रुजवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले.
‘स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि निरोगी समाज’ निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. स्वच्छता ही एक दिवसाची मोहीम नसून सतत चालणारी लोकचळवळ व्हावी, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विरुटकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वाघाडे सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



