ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी पोलिसांच्या तत्परतेमुळे मनोरुग्ण बेपत्ता इसमाचा अल्पावधीत शोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी पोलिसांच्या तत्परतेमुळे ०२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मनोरुग्ण इसमाचा अल्पावधीत शोध घेऊन त्यास सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस स्टेशन देवळी येथे दिनांक २९/०९/२०२६ रोजी तक्रारदार आरती ठोबरे, वय २२ वर्षे, रा. वडद, ता. जि. वर्धा यांनी त्यांचे मनोरुग्ण पती मागील सुमारे ०२ दिवसांपासून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची तक्रार दिली होती.

तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांनी गाव तसेच इतर ठिकाणी शोध घेतला असता त्यांचा ठावठिकाणा मिळून आला नव्हता. दरम्यान तक्रारदार यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. सदर फोनवरून त्यांचे पती अमरावती शहरातील अंबादेवी चौक परिसरात असून ते मनोरुग्णासारखे वर्तन करीत असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देवळी पोलिसांनी तात्काळ अनोळखी मोबाईल क्रमांकाची खातरजमा करून पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर तसेच पोलीस स्टेशन राजापेठ व पोलीस स्टेशन सिटी कोतवालीए अमरावती येथील पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. अमरावती शहर पोलिसांच्या मदतीने तक्रारदार यांचे मनोरुग्ण पती प्रल्हाद ठोबरे, वय ४० वर्षे, रा. छत्रपती संभाजीनगर ह.मु. वडद. ता. जि. वर्धा यांचा शोध घेण्यात आला. त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन देवळी पोलिसांच्या पथकाने पोलीस स्टेशन देवळी येथे आणले. त्यानंतर सदर इसमाची त्यांच्या नातेवाईकांशी खातरजमा करून त्यांना सुखरूपपणे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

या संपूर्ण कारवाईत देवळी पोलीस स्टेशनने दाखविलेली तत्परता, तांत्रिक माहितीचा योग्य वापर तसेच अमरावती शहर पोलिसांशी साधलेला समन्वय यामुळे ०२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मनोरुग्ण इसमाचा अल्पावधीत शोध घेणे शक्य झाले.

देवळी पोलीस स्टेशनकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परता, संवेदनशीलता आणि समन्वयाने कार्य करण्याची भूमिका सातत्याने कायम ठेवण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये