मत्स्यव्यवसाय सहकारी संघाच्या कर्जाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
व्याजमाफी करून मुद्दल रक्कम स्वीकारण्याची अध्यक्ष यादवराव मेश्राम यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ मर्यादितकडे असलेल्या जुन्या कर्जाचा प्रश्न निकाली काढावा, तसेच थकीत व्याजाची रक्कम माफ करून मुद्दल रक्कम एकरकमी स्वीकारावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष यादवराव मेश्राम व संचालक दिवाकर डहारे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४१ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण आमसभेत उपस्थित केली.
चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या जुन्या कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, कर्जावरील वाढत्या व्याजामुळे संघावर आर्थिक भार वाढत असल्याने व्याजाची रक्कम माफ करून केवळ मुद्दल रक्कम स्वीकारावी, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली.
संघाच्या पत्रानुसार, जुन्या कर्जापोटी सुमारे १४ लाख ११ हजार ३५० रुपये मुद्दल, तर सुमारे ३६ लाख ८८ हजार ८५९ रुपये व्याज थकीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संघाने मुद्दलाची रक्कम एकरकमी भरण्याची तयारी दर्शविली आहे.
दरम्यान, ४१ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण आमसभेत अध्यक्ष यादवराव मेश्राम व संचालक दिवाकर डहारे यांनी हा प्रश्न बँकेच्या अध्यक्षांसमोर मांडला. यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा करून संघाचा कर्जाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी दिले.
या आश्वासनामुळे जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला कर्जाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



