ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वाधार योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ द्या, तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये – आ. जोरगेवार

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मुंबई येथे भेट घेत मागणी

चांदा ब्लास्ट

 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या स्वाधार योजनेच्या अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली. मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या तांत्रिक अडचणींकडे मंर्त्यांचे लक्ष वेधले. यावेळी ना. सिरसाट यांनीही समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ यांना मुदतवाढ देण्याच्या सुचना केल्या आहे.

           स्वाधार योजनेच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, २९ सप्टेंबरच्या सकाळपासून स्वाधार योजनेची अधिकृत वेबसाईट तांत्रिक अडचणींमुळे सुरळीतपणे कार्यरत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंतिम मुदत संपण्याच्या पार्श्वभूमीवर वेबसाईटवरील तांत्रिक समस्या कायम राहिल्यास अनेक पात्र विद्यार्थी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

     समाजकार्य महाविद्यालय, पडोली (चंद्रपूर) यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ही समस्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून केवळ तांत्रिक कारणामुळे त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तातडीने स्वाधार योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली.

   यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी या मागणीची दखल घेत समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ यांना स्वाधार योजनेच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरता न आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

           विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित योजना असल्याने शासनाने तांत्रिक अडचणी दूर करून सर्व पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये