ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणी येथे वन कामगारांचे २१व्या दिवशीही साखळी उपोषण सुरू

मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणी : राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महाराष्ट्र शाखेच्या वतीने अध्यक्ष भाष्करराव मुडे यांच्या नेतृत्वाखाली हिंगणी येथील बाजार चौकातील वन परिक्षेत्र कार्यालयासमोर गेल्या २० जुलै २०२६ पासून साखळी उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा २१वा दिवस असूनही वन विभागाकडून अद्याप कोणतेही लेखी आश्वासन देण्यात आले नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, वन विभागाचे रेंजर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. मात्र, २१ दिवस उलटूनही मागण्यांबाबत कोणतेही लेखी पत्र अथवा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

काही जुने वन कामगारांनी वन विभागात चार ते पाच वर्षे काम करूनही त्यांच्या कामाचा व हक्काचा मोबदला अथवा शासनाच्या नियमानुसार रोजगाराचा अधिकार मिळालेला नसल्याचे सांगितले. कामगारांच्या वयाचा विचार करून त्यांना नोकरीत सामावून घ्यावे, तसेच वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना शासन-प्रशासनाच्या नियमानुसार वेतन अथवा आर्थिक लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, वयोमानामुळे संबंधित कामगारांना नोकरी देणे शक्य नसल्यास त्यांच्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरळ नोकरी भरती प्रक्रियेत समाविष्ट करून रोजगाराची संधी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या साखळी उपोषणासंदर्भात आज १० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाल उप वन संवरक्षक कार्यालय वर्धा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात हिंगणी येथील 1994-95च्या वनपरिक्षेत्रातील एकूण 87कामगार वणकामगार यादीतील 23आणी एफ डी. सी. एम. चे 113कामगार अश्या एकूण 223कामगारांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

“आम्ही ज्या जिल्ह्यात जगत आहोत, तो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जिल्हा आहे. येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी वारंवार उपोषण करण्याची वेळ येत असेल आणि उपोषण करूनही न्याय मिळत नसेल, तर येणाऱ्या काळात आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.

यावेळी हिंगणी येथील संघटनेचे अध्यक्ष भाष्कर मुडे, गुणवंतराव सरवरे, शंकरराव दुर्गे, मनोहर पोकळे तसेच सौ. जया कुचणकर यांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये