जागतिक मूळनिवासी दिनानिमित्त जिवतीत सामाजिक प्रश्नांवर मंथन
घोडणकप्पी रस्त्यासह अत्याधुनिक सभागृह, जंगोदेवी देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जागतिक मूळनिवासी (आदिवासी) दिनानिमित्त मूळनिवासी एकता संघर्ष समिती, जिवती यांच्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक प्रश्नांवर विचारमंथन करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते झाले. गजानन पाटील जुमनाके हे सहउद्घाटक म्हणून उपस्थित होते.
यावेळी आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. जिवती तालुक्यातील मौजा घोडणकप्पी गावासाठी रस्ता निर्माण करावा, जिवती येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक सभागृह मंजूर करावे, तसेच सभागृहासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर गंगामाता देवस्थानाच्या धर्तीवर जंगोदेवी देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, तसेच गोंडी धर्म कोडचा विषय विधानसभेत मांडावा, अशी मागणी आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे करण्यात आली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वक्त्यांनी वीर बाबुराव शेडमाके, राजमाता राणी हिराई आत्राम यांच्यासह महान क्रांतिकारक व समाजसुधारकांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. आदिवासी समाजाने शिक्षण, संघटन आणि विकासाचा मार्ग स्वीकारून सामाजिक प्रगती साधावी, असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करून सशक्त, जागरूक आणि प्रगत समाज घडविण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव पा. वलका होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नागनाथ दुडूळे उपस्थित होते. यावेळी माजी सभापती भीमराव मेश्राम, नगराध्यक्ष अनुसया राठोड, माजी नगराध्यक्ष पुष्पाताई नैताम, नगरसेविका सतलुबाई जुमनाके, नगरसेवक शामराव गेडाम, मारुती कुमरे, माजी सरपंच भोजू पाटील आत्राम, झाडू कोडापे, लक्ष्मीबाई जुमनाके, सरपंच हनुमंत कुमरे, कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव जुमनाके, जिवती नगरपंचायतीचे उपाध्यक्ष जमालुद्दीन शेख, माजी सरपंच सोनेराव पेंदोर, आदिवासी सोसायटी कोदेपूरचे सभापती आनंदराव शेडमाके, बुद्धराव कोडापे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता धुर्वे, गौरुबाई कोटनाके, गोविंदराव कुमरे यांच्यासह विविध गावांचे पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी संस्थांचे संचालक आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मूळनिवासी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे कोषाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते कंटू कोटनाके यांनी केले, तर आभार प्रदर्शन केशवराव कुमरे यांनी केले. विजय पाटील जुमनाके, जगू मेश्राम, गणपत वेट्टी यांच्यासह समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधत शिक्षण, संघटन, हक्क आणि विकासाच्या माध्यमातून समाजाला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



