जिवतीत पारंपरिक सुईणींचा सन्मान
चार गावांत उपक्रम; मूलनिवासी ज्ञानपरंपरेला उजाळा — पेसा महासंघ व ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचा स्तुत्य पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- विश्व मूलनिवासी समुदाय आंतरराष्ट्रीय दिनाची यंदाची “मूलनिवासी सुईणींचा सन्मान : जीवन आणि कल्याणाचे संरक्षण” ही संयुक्त राष्ट्रांची थीम केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा अनोखा उपक्रम जिवती तालुक्यात राबविण्यात आला. जिवती पेसा महासंघ तथा ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन, जिवती यांच्या पुढाकाराने महापांढरवाणी, घारपणा, खडकी हिरापूर आणि जिवती येथे पारंपरिक सुईणींचा सार्वजनिक व्यासपीठावर सन्मान करण्यात आला.
दुर्गम व आदिवासीबहुल जिवती तालुक्यात आधुनिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध नसलेल्या काळात पारंपरिक सुईणींनी आदिवासी समाजातील मातांच्या प्रसूतीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. रात्र-दिवस, पाऊस अथवा डोंगर-दऱ्यांचा दुर्गम परिसर याची पर्वा न करता प्रसूत महिलांना आधार देणे, मानसिक धीर देणे आणि कुटुंबीयांना मार्गदर्शन करणे, अशी सेवा त्यांनी निःस्वार्थपणे बजावली.
पिढ्यान्पिढ्या अनुभवातून पुढे आलेले या सुईणींचे ज्ञान हे मूलनिवासी समाजाच्या समृद्ध पारंपरिक आरोग्यज्ञानाचे प्रतीक आहे. त्यामुळे सुईणींचा सन्मान हा केवळ व्यक्तींचा गौरव नसून मातृत्व, स्त्रीशक्ती, सेवाभाव आणि मूलनिवासी ज्ञानपरंपरेचा सन्मान असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
‘पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करा’
जिवतीसारख्या दुर्गम भागातील पारंपरिक सुईणींच्या योगदानाची शासनाने अधिकृत दखल घ्यावी, तसेच प्रत्येक शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आदिवासी कार्यक्रमात पारंपरिक सुईणींचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ज्येष्ठ सुईणींचे अनुभव, कार्यपद्धती आणि पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करून ते पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. पारंपरिक ज्ञानाचा सन्मान राखतानाच आधुनिक आरोग्यसेवा, सुरक्षित मातृत्व आणि संस्थात्मक प्रसूती सुविधा यांच्याशी योग्य समन्वय साधण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
पेसा महासंघाचा सक्रिय सहभाग
या उपक्रमाच्या आयोजनासाठी पेसा महासंघाचे अध्यक्ष सितरू गेडाम यांच्यासह संतोष जी. सलाम, लच्चू वल्का, चेनराव मडावी, गंगू गेडाम, भीमराव मेश्राम, अनिल आडे, लच्चू सोयाम, गंगाधर आत्राम, मोतीराम शिराम, गोजू पेंदोर, भीमराव कन्नाके आणि दिनेश सोयाम आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा सदस्य लिंगोराव सोयाम यांनीही उपक्रमासाठी सहकार्य केले.
“थीम सांगण्यात नव्हे, कृतीत उतरवण्यातच खरा अर्थ!”
९ ऑगस्टच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांची थीम मांडणे सोपे आहे; मात्र ती आपल्या गावात आणि समाजाच्या कृतीत उतरवणे हीच या दिवसाची खरी सार्थकता आहे. चार गावांमध्ये पारंपरिक सुईणींचा करण्यात आलेला सन्मान हा युनोच्या २०२६ च्या थीमला स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा अनुकरणीय उपक्रम ठरला आहे.
“थीम सांगण्यात नव्हे, ती समाजाच्या कृतीत उतरवण्यातच ९ ऑगस्टचा खरा अर्थ आहे!” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



