मोकाट जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांवर रामनगर पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
रस्त्यावर मोकाट जनावरे सोडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस स्टेशन रामनगर यांनी संबंधित जनावरांच्या मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
या प्रकरणी संबंधित मालकांविरुद्ध कलम 285 भारतीय न्याय संहिता (BNS), सहकलम 90(अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 तसेच कलम 11(1)(H) व 11(1)(I) प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम, 1960 अन्वये गुन्हा क्रमांक 701/2026 व 702/2026 असे दोन गुन्हे पोलीस स्टेशन रामनगर येथे नोंद करण्यात आले आहेत.
कारवाईदरम्यान संबंधित गुरांचे पशुवैद्यकीय तपासणी (मेडिकल) करून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोशाळेमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यावर मोकाट जनावरे सोडल्यामुळे अपघात होण्याची व वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत व त्यांची योग्य देखभाल करावी. अन्यथा संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रामनगर पोलिसांनी दिला आहे.



