ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत महाआरोग्य शिबिर

२ ऑगस्टला चंद्रपुरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा

चांदा ब्लास्ट

चंद्रपुर :- आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत रविवार, २ ऑगस्ट रोजी चंद्रपुरात भव्य निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत राजीव गांधी महाविद्यालय, इंदिरा नगर, मूल रोड येथे होणाऱ्या या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार, मार्गदर्शन व औषधोपचार करणार आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, टाटा ट्रस्ट केअर फाउंडेशन चंद्रपूर  शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर आणि आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या महाआरोग्य शिबिरात मेडिसिन, हृदयरोग, किडनीरोग, मेंदूरोग, शस्त्रक्रिया, बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग तसेच मुखरोग या विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत. रक्तदाब, मधुमेह, ताप, हृदयविकार, किडनीचे आजार, हर्निया, थायरॉईड, मोतीबिंदू, सांधेदुखी, त्वचारोग, दंतविकार, महिलांचे आजार, बालरोग तसेच कान-नाक-घशाशी संबंधित विविध आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना निःशुल्क कर्णयंत्र उपलब्ध करून देण्याची सुविधाही या शिबिरात असणार आहे.

शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मोफत रोगनिदान, नेत्र तपासणी, कॅन्सर रोगनिदान, रक्ततपासणी, आवश्यक औषधांचे विनामूल्य वितरण तसेच आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिबिरात तपासणीनंतर ज्या रुग्णांना अधिक तपासण्या अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल, त्या सर्व तपासण्या आणि उपचार संबंधित रुग्णालयात विनामूल्य करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या आरोग्य उपक्रमाचे आयोजन आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराने केले असून डॉ. मंगेश गुलवाडे हे मुख्य संयोजक आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासाठी विविध संयोजकांकडे नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून संपर्कासाठी स्वतंत्र समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये