पत्रकार संरक्षण संघाच्या विदर्भ प्रांताध्यक्षपदी शब्बीर सय्यद यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- पत्रकार संरक्षण संघ, महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष नाथा देवराम उंद्रे (पाटील) यांनी पत्रकार संरक्षण संघाच्या विदर्भ प्रांत (महाराष्ट्र) अध्यक्षपदी शब्बीर नुरुद्दीन सय्यद (जागीरदार) यांची नियुक्ती केली आहे. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध समस्या सोडविणे तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अडचणींवर कायदेशीर व सनदशीर मार्गाने लढा उभारण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना कार्य करताना अनेक अडचणी आणि आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन व प्रशासनापुढे प्रभावीपणे आवाज उठविणे, त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी संघटित प्रयत्न करणे आणि पत्रकारांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा पत्रकार संरक्षण संघाचा प्रमुख उद्देश असल्याचे संस्थापक अध्यक्ष नाथा उंद्रे यांनी सांगितले.
नवनियुक्त विदर्भ प्रांताध्यक्ष शब्बीर नुरुद्दीन सय्यद (जागीरदार) यांच्यावर विदर्भातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्या, हक्क आणि सुरक्षेसाठी कायदेशीर व सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, शब्बीर नुरुद्दीन सय्यद यांच्या नियुक्तीचे पत्रकारिता क्षेत्रासह विविध सामाजिक व राजकीय स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील पत्रकारांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सक्षमपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



