जिमची इमारत ठरतेय ‘पांढरा हत्ती’
लाखो रुपयांची इमारत वापरा अभावी धूळखात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- शहरातील भवानी नगर परिसरात आमदार निधीतून लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली अत्याधुनिक जिमची इमारत आज प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अक्षरशः ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे. युवकांच्या आरोग्यवृद्धी, शारीरिक तंदुरुस्ती आणि पोलीस, सैन्य, वनविभाग तसेच विविध शासकीय भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांच्या हितासाठी उभारण्यात आलेली ही महत्त्वाकांक्षी योजना वर्षानुवर्षे बंदच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
युवकांना आधुनिक व्यायामाची सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रामीण भागातील तरुणांना नाममात्र शुल्कात दर्जेदार जिम मिळावी आणि स्पर्धा परीक्षांसाठी शारीरिक तयारीचे सक्षम व्यासपीठ निर्माण व्हावे, या उद्देशाने लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र जिमसाठी आवश्यक साहित्य खरेदी, प्रशिक्षकांची नियुक्ती आणि सुविधा सुरू करण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने ही इमारत केवळ शोभेची वास्तू बनली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, युवकांच्या उपयोगासाठी उभारलेली ही सार्वजनिक इमारत आता दारुड्यांचा अड्डा बनल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. सायंकाळच्या वेळी येथे मद्यपींचा वावर वाढत असल्याने परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होण्याची शक्यताही वाढली असून प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
एकीकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम युवक चंद्रपूर येथील खासगी जिममध्ये मोठी फी भरून व्यायाम करत आहेत, तर दुसरीकडे गरीब आणि ग्रामीण भागातील युवकांना व्यायामाची मूलभूत सुविधाही उपलब्ध नाही. नगरपंचायतीची जिम सुरू झाल्यास शेकडो युवकांना त्याचा थेट लाभ होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी नगरपंचायतीकडे तातडीने जिमसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून प्रशिक्षकांची नियुक्ती करावी आणि ही सुविधा सर्वसामान्यांसाठी खुली करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या इमारती वर्षानुवर्षे बंद ठेवणे म्हणजे जनतेच्या पैशाची उघड उधळपट्टी असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
आता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन या गंभीर प्रश्नावर तातडीने निर्णय घेणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार, याकडे संपूर्ण जिवतीकरांचे लक्ष लागले आहे. अन्यथा लाखो रुपयांच्या खर्चातून उभारलेली ही जिमची इमारत ‘पांढरा हत्ती’ आणि दारुड्यांचा अड्डा अशीच ओळख कायम ठेवेल, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.



