ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल RCERT चे प्राध्यापक डॉ. अमित एन. अक्केवार यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय (RCERT), चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. अमित एन. अक्केवार यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे होते. त्यांच्या हस्ते विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे डॉ. अमित एन. अक्केवार यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. धात्रक यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी डॉ. अक्केवार यांचे अभिनंदन करत त्यांच्या संशोधनातील यशाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, प्राध्यापकांचे संशोधन क्षेत्रातील योगदान हे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची देणारे असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. संशोधनाची परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी असे यश अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी विभागप्रमुख डॉ. आर. के. धात्रक यांनीही डॉ. अक्केवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधन व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात प्रो. धनंजय मेश्राम यांनीही डॉ. अमित एन. अक्केवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली. उपस्थितांनी डॉ. अक्केवार यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

सत्कारास उत्तर देताना डॉ. अमित एन. अक्केवार यांनी पीएच.डी. संशोधनाच्या कालावधीत वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे, विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. धात्रक, विभागातील सर्व प्राध्यापक, तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत आसुटकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये