मोठे स्वप्न पाहणारेच मोठे यश मिळवतात : प्रा. रत्नाकर शिरसाट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :-“विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले, तर यश निश्चित मिळते. मोठे स्वप्न पाहणारेच मोठे यश मिळवतात,” असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रा. रत्नाकर शिरसाट सुप्रसिद्ध वक्ते, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा संचालक रिझल्ट पॉईंट अकॅडेमी नागपूर यांनी केले.
विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सेल तसेच जागृत संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विशेष कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गजानन राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून अविनाश पोईणकर (कवी, साहित्यिक, लेखक, समाजसेवक तथा संचालक, जागृत संस्था, चंद्रपूर) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गंगाधर लांडगे, डॉ. परवेझ अली आणि प्रा. सचिन शिंदे समन्वयक प्लेसमेंट सेल यांची उपस्थिती लाभली.
यावेळी प्रा. रत्नाकर शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास याविषयी सखोल मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावरच यश संपादन करता येते, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी अविनाश पोईणकर यांनी विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि सर्जनशील विचारसरणी जोपासण्याचे आवाहन केले. उच्च शिक्षणाबरोबरच साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा समतोल विकास विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक समृद्ध करतो, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. गजानन राऊत यांनी विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शन कार्यशाळांचा लाभ घेऊन आपल्या करिअरची स्पष्ट दिशा निश्चित करावी आणि स्पर्धा परीक्षांसाठी आजपासूनच नियोजनपूर्वक तयारी सुरू करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. योगेश खेडेकर यांनी केले, तर आभार प्रा. गणेश कदम यांनी मानले.



