पोटच्या पोराने केला जन्मदात्या मातेचा खून
आरोपी मुलास गोंडपिपरी पोलिसांकडून अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
*”पुत्र व्हावा ऐसा गुंडा…ज्याचा तिन्ही लोकी झेंडा..!”, अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. याच म्हणीचा प्रत्यय गोंडपिपरी तालुकावासियांना घडून आला. ज्या मातेने नऊ महिने गर्भात सांभाळ केला, असह्य वेदना सहन करून जन्म दिला, ममतेची कमी न भासवता दुधाची भूक भागविली, तळहाताच्या फोळाप्रमाणे ज्याचा सांभाळ केला आणि खऱ्या अर्थाने दैवत्व रूपात निसर्गरूपी जग दाखविले, त्याच मातेचा लेकराच्या हातून खून व्हावा आणि संपूर्ण जगाचा आपल्या लेकरांवरील वरील विश्वास उडून जावा. अशीच एक घटना घडली गोंडपिपरी तालुक्यातील कोरंबी या गावात.*
सविस्तर वृत्त असे की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन गोंडपिपरी अंतर्गत येत असलेल्या कोरंबी गावात घरातील किरकोळ कारणावरून वाद झाला.
आरोपी सुरज मारोती मोहुर्ले (वय ३२ वर्षे, रा. कोरंबी, ता. गोंडपिंपरी) याने त्याचे वडील व आई यांच्यासोबत वाद घालत असताना हातातील लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्याची आई प्रतिभा मारोती मोहुर्ले (वय ५० वर्षे) गंभीर जखमी झाली.
जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिंपरी व त्यानंतर सामान्य रुग्णालय चंद्रपूर व तेथुन मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी फिर्यादी विकास मारोती मोहुर्ले यांच्या तक्रारीवरून, पोलीस स्टेशन गोंडपिंपरी येथे अपराध क्रमांक २९८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे करीत आहेत.



