ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा बाजार समितीच्या तारण योजनेत धानाला ४,२६५ चा उच्चांकी भाव

६२ शेतकऱ्यांच्या ३,०६७ क्विंटल धानाला बाजारभावापेक्षा प्रति क्विंटल ६०० ते ८०० अधिक दर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यंदा धानाला समाधानकारक दर मिळाला आहे. योजनेअंतर्गत ६२ शेतकऱ्यांनी एकूण ३ हजार ६७ क्विंटल धान तारण ठेवले होते. त्यानंतर झालेल्या खुल्या लिलावात धानाला प्रति क्विंटल ४,२२५ ते ४,२६५ असा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लिलावात वासुदेव झुगाजी नागापुरे (फुटाणा), काशिनाथ नामदेव व्याहळकर (दिघोरी) आणि मुरलीधर बाबाजी गौरकर (सोनापूर) यांच्या धानाला ४,२६५ प्रति क्विंटल असा सर्वाधिक भाव मिळाला. तर उर्वरित शेतकऱ्यांच्या धानाला ४१२५ ते ४,२६५ दरम्यान भाव मिळाला.

धान उत्पादनानंतर सुरुवातीच्या काळात बाजारात धानाला केवळ २,५०० ते २,८०० प्रति क्विंटल दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने धान विकण्याची वेळ येत होती. मात्र, तारण योजनेमुळे शेतकऱ्यांनी धान साठवून ठेवले आणि लिलावापूर्वीच त्यांना धानाच्या किमतीच्या ७५ टक्के अग्रीम रकमेचा लाभ मिळाला. त्यामुळे आर्थिक गरज भागवितानाही धान कमी दराने विकावे लागले नाही.पोंभुर्णा, गोंडपिपरी, मूल, बल्लारपूर आणि गडचिरोली येथील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेतल्याने स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. परिणामी, शेतकऱ्यांना बाजारातील नियमित दरापेक्षा प्रति क्विंटल ६०० ते ८०० अधिक दर मिळाला.

लाभार्थी शेतकरी वासुदेव झुगाजी नागापुरे यांनी तारण योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरल्याचे सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सभापती रवींद्र मरपल्लीवार, उपसभापती आशिष कावटवार, प्रभारी सचिव लिलाधर बुरांडे व संचालक रवींद्र गेडाम, नैलेश चिंचोलकर, डॉ. निलेश पावडे, धनराज सातपुते, राकेश गव्हारे, वसंत पोटे, वासुदेव पाल, अशोक साखलवार, प्रवीण पिदुरकर, विलास मोगरकर, विनोद थेरे, प्रफुल्ल लांडे, विनायक बुरांडे, सुनील कटकमवार,भारती बदन आणि सुनंदा गोहणे यांची उपस्थिती संपन्न झाला.

*लिलावापूर्वीच मिळाली ७५ टक्के अग्रीम रक्कम*

कमी बाजारभावाच्या काळात शेतकऱ्यांना आथिक अडचर्णीचा सामना करावा लागू नये, यासाठी कृषी उत्पत्न बाजार समितीने तत्काळ ७५ टक्के अग्रीम रक्कम उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत मिळाली आणि नंतर झालेल्या लिलावात विक्रमी दर मिळाल्याने उत्पन्नातही वाढ झाली. बाजार समितीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतमाल साठवून योग्य भावाची प्रतीक्षा करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये