ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चंद्रपूर बसस्थानक ते इंदिरा गांधी चौक उड्डाणपुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन पुलाची उभारणी करा
मुंबई व पुणे प्रवासासाठी आठवड्यातून ३ ते ४ दिवस विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट
खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न व नागरी वाहतुकीशी संबंधित विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान त्यांनी रेल्वेमंत्र्यांना मागण्यांचे विशेष निवेदन सादर करून जिल्ह्यातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व सोयीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.
या भेटीतील मुख्य मुद्द्यांपैकी एक म्हणजे चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागातील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग मानला जाणारा चंद्रपूर बसस्थानक ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक दरम्यानचा रेल्वे उड्डाणपूल होय. हा पूल गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत असून आजघडीला अत्यंत कालबाह्य व जीर्ण झालेला आहे. दररोज या पुलावरून हजारो लहान-मोठी वाहने आणि नागरिक प्रवास करतात, ज्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या पुलाचे तात्काळ ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात यावे आणि भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी जुना पूल पाडून त्याठिकाणी आधुनिक व नवीन पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
यासोबतच, चंद्रपूर हा विदर्भातील प्रमुख औद्योगिक जिल्हा आणि राज्याला सर्वाधिक महसूल देणारे शहर असतानाही, येथून मुंबई व पुणे या प्रमुख शहरांसाठी थेट व पुरेशी रेल्वे सेवा उपलब्ध नाही, ही बाब त्यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. चंद्रपूर येथे नवीन कोचिंग टर्मिनल व पिट लाईन उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात चंद्रपूर-मुंबई व चंद्रपूर-पुणे या मार्गांवर आठवड्यातून किमान ३ ते ४ दिवस चालणाऱ्या विशेष गाड्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय देशाची राजधानी दिल्ली आणि बंगळुरूला जोडणाऱ्या बंगळुरू-दिल्ली राजधानी एक्सप्रेसला चंद्रपूर स्टेशनवर दोन्ही फेऱ्यांमध्ये थांबा मंजूर करण्यात यावा, ज्यामुळे व्यापारी, विद्यार्थी व रुग्णांची मोठी सोय होईल, असा मुद्दा त्यांनी मांडला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडलेल्या सर्व मागण्या आणि बसस्थानक परिसरातील उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा विषय अत्यंत गांभीर्याने घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या सर्व विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.



