ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी हा देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ; त्याच्या प्रश्नांसाठी किसान मोर्चाने गावागावात पोहोचावे – आ. सुधीर मुनगंटीवार

शेतकऱ्यांच्या योजनांचा लाभ वेळेत मिळतोय का, हे तपासा; प्रश्नांच्या मुळाशी जाऊन काम करण्याचे आ. मुनगंटीवार यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट

चंद्रपुरात दोन दिवसांची शेतकरी कार्यशाळा घेऊन शेतीविषयक दिशादर्शक प्रस्ताव तयार करण्याची आ.मुनगंटीवार यांची सूचना

 

चंद्रपूर – शेतकऱ्याच्या घामातून देशाची भूक भागते आणि त्याच्या कष्टातून देशाची अर्थव्यवस्था उभी राहते. त्यामुळे शेतकरी हा केवळ शेती करणारा घटक नाही, तर देशाच्या अन्नसुरक्षेचा कणा आणि राष्ट्राच्या प्रगतीचा खरा आधार आहे. अशा अन्नदात्याच्या प्रश्नांकडे केवळ योजनांच्या आणि आकडेवारीच्या चौकटीतून पाहून चालणार नाही; त्याच्या बांधावर जाऊन त्याची व्यथा समजून घ्यावी लागेल. किसान मोर्चाने गावागावात, शेताच्या बांधापर्यंत आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याचा आवाज बनले पाहिजे. शेतकऱ्याचा प्रश्न हा आपला प्रश्न मानून तो शासनापर्यंत ताकदीने पोहोचवणे आणि त्याला न्याय मिळवून देणे, हीच किसान मोर्चाची खरी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर (ग्रामीण) जिल्ह्याच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय किसान मोर्चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्णजी वेताळ, संयोजक तथा अग्रीक्रॉस प्रमुख रवी निगुडे, किसान मोर्चाचे महामंत्री संतोष देशमुख, रंगनाथ सोलंकी, विजय पिदुरकर, रवी चहारे, कृषी मूल्य आयोगाचे सदस्य बंडू गौरकार,देवानंद महाजन, प्रमोद कडस्कर, अनिल मोरे तसेच जिल्ह्यातील किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात आमदार मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत किसान मोर्चाची आगामी भूमिका, संघटनबांधणी आणि शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.आमदार मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम उपस्थित शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत, “शेतकरी बांधवांवर कोणतेही संकट अथवा विघ्न येऊ नये,” अशी प्रार्थना सुखकर्ता-विघ्नहर्ता श्री गणेशाच्या चरणी केली.

आपल्या सर्वांसाठी ‘जय जवान, जय किसान’ हा केवळ नारा नाही. ज्या व्यवसायावर देशाच्या पालनपोषणाची सर्वात मोठी जबाबदारी आहे, त्या शेती व्यवसायाला आणि शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.महाराष्ट्रातील शेतीचे व्यापक महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, राज्यात 1 कोटी 71 लाख सातबारा धारक आहेत. शेतीवर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष स्वरूपात कोट्यवधी लोकांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे शेती हा केवळ एक व्यवसाय नसून समाजाच्या आर्थिक जीवनाचा कणा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज मातेची सेवा करणाऱ्याला सुपुत्र, तर मातीची सेवा करणाऱ्याला शेतकरी म्हणतो. मनुष्याचे जीवन बदलून टाकणारा जगातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे नांगर. नांगराचा शोध लागल्यानंतर माणूस स्थिर झाला आणि शेती हा पहिला व्यवसाय ठरला. मात्र आज प्रगतीच्या प्रवासात शेती हा शेवटचा व्यवसाय बनत चालला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ या पारंपरिक म्हणीचा संदर्भ देत ते म्हणाले की, एकेकाळी शेतीला सर्वोच्च स्थान होते; मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. शेतकरी कष्ट आणि परिश्रम करतो, पण त्याची संघटित ताकद वाढविण्याची गरज आहे. “शेतकऱ्यांनी नशिबावर दोष देऊन शांत बसण्याऐवजी संघटित होऊन आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठविला पाहिजे,” असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.

योजना पोहोचल्या; शेतकरी समाधानी आहे का

किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नेतृत्व करायचे असेल तर संघटनबांधणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या गावापर्यंत किसान मोर्चाची संघटना पोहचली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र त्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यात आपण किती यशस्वी झालो, याचे चिंतन-मंथन होणे आवश्यक आहे.योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचविल्यानंतर तो खरोखर समाधानी झाला आहे का, त्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत का, याचेही मूल्यमापन झाले पाहिजे,” असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या विलंबावरही त्यांनी लक्ष वेधले. “शेतकऱ्यांच्या योजनांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अनेक टोल लागले आहेत. त्या टोलमुळे त्याच्या मनात आनंदापेक्षा तिरस्कार अधिक निर्माण होतो. सबसिडीवर ट्रॅक्टर घेतला, मात्र सबसिडी अनेक वर्षांनी मिळाली, तर त्या योजनेचा उद्देशच कमकुवत होतो,” असे सांगत योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान मोर्चाने सक्रिय राहावे

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर किसान मोर्चाने सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन करताना आ.मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न विधानसभेत मांडला असून धानाच्या बोनससाठीही सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. धानाचा शेतकरी हा गरीब शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली पाहिजे.महाराष्ट्राचा स्वाभिमान जागविणारा कोणी असेल तर तो शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संघटना मजबूत झाली पाहिजे आणि त्याचबरोबर वैचारिक मंचही मजबूत झाला पाहिजे,” असे आ.मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपुरातून शेतीविषयक दिशादर्शक प्रस्ताव तयार करा

किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्णजी वेताळ यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आ.मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक आयोजित करण्याची सूचना केली. तसेच दोन दिवसांची शेतकरी कार्यशाळा घेऊन शेतीशी संबंधित विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्याचे आवाहन केले.चंद्रपुरात होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये शेती हा व्यवसाय पुढे जाण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करा. हा प्रस्ताव शेतकरी, कृषी विभाग आणि कृषी मंत्रालयासाठी दिशादर्शक ठरला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ कागदावर किंवा बैठकीत समजून न घेता गावागावात प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या आणि त्या शासनापर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.

चंद्रपूरच्या भूमीतून पहिली संघर्ष किसान यात्रा

भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी आंदोलनाच्या इतिहासाचा संदर्भ देताना आ.मुनगंटीवार यांनी लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या नेतृत्वाची आठवण करून दिली. 36व्या वर्षी लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले. पुढे जायचे असेल तर शेतकऱ्यांना आपला पक्ष आपलासा वाटला पाहिजे, या भावनेतून त्यांच्या नेतृत्वाखाली 1986 मध्ये भारतीय जनता पार्टीची पहिली संघर्ष किसान यात्रा चंद्रपूरच्या काळाराम मंदिरापासून निघाली, असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.चंद्रपूरच्या भूमीला शेतकरी आंदोलनाची आणि संघटनात्मक संघर्षाची परंपरा लाभली असल्याचे नमूद करत, याच भूमीतून आजच्या काळातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नवी दिशा देणारे काम किसान मोर्चाने उभे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

चार बाबींना केंद्रस्थानी ठेवून काम करावे

“हम रहे या ना रहे, भारत ये रहना चाहिये,” या भावनेने शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, किसान मोर्चाने संवेदनशीलता, अभ्यास, संघटन आणि प्रत्यक्ष कृती या चारही बाबींना केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करावे, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये