गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वर्धा पोलिसांची सज्जता : नागरिकांना शांतता व सुरक्षिततेचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून, गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी वर्धा शहरातील प्रमुख मार्गावर व गणपती विसर्जन मार्गावर पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
पोलिसांनी शहरातील प्रमुख बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील भाग, प्रमुख चौक तसेच गणपती विसर्जनासाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गाची पाहणी करत रूट मार्चद्वारे पोलीस बंदोबस्ताची प्रत्यक्ष तयारी दर्शविली. गणेशोत्सव हा सर्वधर्मीयांनी एकोप्याने, उत्साहाने आणि शांततेत साजरा करण्याचा उत्सव असून, या कालावधीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी वर्धा पोलीस दलाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण, संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त तसेच समाजकंटकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे नागरिकांना आवाहन :-
गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि परस्परांच्या भावनांचा आदर राखून साजरा करावा. गणेश मंडळांनी प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करू नये. अफवा. चुकीच्या बातम्या किंवा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच ते पुढे प्रसारित करू नयेत. संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. वर्धा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास सज्ज आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि गणेशोत्सवाचा आनंद शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा राखून घ्यावा.
वर्धा पोलिसांची स्पष्ट भूमिका उत्सव आनंदाने साजरा करा; मात्र कायदा हातात घेऊ नका.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षित. शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून गणेशोत्सव उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन वर्धा जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे नेतृत्वात रुट मार्च चे आयोजन करण्यात आले. रुट मार्च करिता श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा तसेच जिल्हा पोलीस दलातील २१ पोलीस अधिकारी, २०० पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड, २ दंगल नियंत्रण पथके, १ जलद प्रतिसाद पथक (QRT) तसेच १ SRPF प्लाटून सहभागी झाले होते.



