गरमसूरच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; महिनाभरापासून मार्ग बंद
ग्रामस्थांचा संताप..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू : बोर व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित गरमसूर गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून, ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पुनर्वसनासाठी कलम ११ अंतर्गत अधिसूचना होऊन सुमारे सहा महिने उलटले, व तसेच पुनर्वसन मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होऊनही तरी प्रत्यक्ष पुनर्वसनाच्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, आमगाव गेटवरून गरमसूरकडे जाणारा मार्ग गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजगारासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून, काही निराधार कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. KYC प्रक्रियेमुळे काहींचे मानधन अथवा पगार रखडल्याने जीवन जगणे कठीण झाल्याचीही ग्रामस्थांची तक्रार आहे.
पुनर्वसनाच्या नावाखाली केवळ आश्वासनांचा मारा
गरमसूर गावाच्या पुनर्वसनाला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कार्यवाही संथ असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे. वनविभागाकडून कारवाई होत असताना पुनर्वसनाचा प्रश्न मात्र प्रलंबित असल्याचा आरोप पुनर्वसन संघर्ष समितीने केला आहे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन बाधित ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांचा धोका कायम असताना गावकऱ्यांना असुरक्षित परिस्थितीत राहावे लागत असल्याने भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी शासन-प्रशासनावर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
“गरमसूरसारख्या गावात एखाद्या नागरिकाचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्यास संबंधित जबाबदार शासन यंत्रणेविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वेळ येऊ नये. त्यापूर्वीच प्रशासनाने पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करावी,” अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि संबंधित वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गरमसूरच्या पुनर्वसनाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी पुनर्वसन संघर्ष समिती व ग्रामस्थांनी केली आहे



