ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिव्यांग प्रवाशाला न्याय मिळावा

कर्तव्यात कसूर करणाऱ्या एसटी वाहकावर कठोर कारवाई करा : निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये दिव्यांग प्रवाशाला राखीव आसन न देणे, अपमानास्पद वर्तन करणे, जिवे मारण्याची धमकी देणे तसेच बस क्रमांकाबाबत प्रवाशांची दिशाभूल केल्याचा आरोप करत पत्रकार तथा 59 टक्के दिव्यांग (UDID धारक) मनोज रामदास मोडक यांनी वरोरा आगाराच्या व्यवस्थापक उत्कर्षा चौधरी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित बस वाहक श्री. सी. के. हनवते यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मोडक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 18 जुलै 2026 रोजी भद्रावती ते नागपूर प्रवासादरम्यान दिव्यांगांसाठी राखीव आसन उपलब्ध करून देण्याची विनंती करूनही संबंधित वाहकाने कोणतीही मदत केली नाही. उलट उद्धट व अपमानास्पद भाषेत बोलून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बराच वेळ वाद झाल्यानंतर एका महिला प्रवाशाने स्वखुशीने जागा दिल्यामुळे त्यांना बसता आले. मात्र संबंधित वाहकाने राखीव आसन उपलब्ध करून देण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीत आणखी एक गंभीर बाब मांडण्यात आली असून, बसच्या तिकीटावर “MH-5820” असा क्रमांक नमूद असताना प्रत्यक्ष बसचा नोंदणी क्रमांक “MH-40/CS-3990” असल्याचे छायाचित्रातून स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे तिकीट मशीनमध्ये बसचा योग्य क्रमांक अद्ययावत न करता प्रवाशांची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच संबंधित वाहक प्रवासादरम्यान खर्रा खात खिडकीतून थुंकत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरणही उपलब्ध असल्याचे मोडक यांनी म्हटले आहे.

यावेळी व्यवस्थापक उत्कर्षा चौधरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी तक्रार स्वीकारून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मोडक यांनी दिली.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित वाहकावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, आवश्यक असल्यास निलंबित करावे, तसेच भविष्यात दिव्यांग प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण आणि तिकीटावरील माहितीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व चालक-वाहकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये