ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोहणा शिवारातून सौर पंपाची मोटार व केबल चोरी; शेतकऱ्यांचे १८ हजारांचे नुकसान 

सोलार कृषी पंपावर चोरट्यांचा डल्ला; देऊळगाव राजा तालुक्यात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : तालुक्यातील रोहणा शिवारात शेतात बसविण्यात आलेल्या कृषी सौर पंपाची मोटार आणि केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्याचे सुमारे १८ हजार ७२० रुपयांचे नुकसान झाले असून, देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुजाराम विश्वनाथ खरात (वय ४०, रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या शेतात ओसवाल कंपनीचा ७.५ एचपी क्षमतेचा कृषी सौर पंप बसविला होता.

दि. २० जुलै २०२६ रोजी रात्री ११.३० ते २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी सौर पंपाची मोटार आणि सुमारे ८० फूट केबल वायर चोरी केली. २१ जुलै रोजी सकाळी फिर्यादी शेतात गेल्यानंतर मोटार आणि केबल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र साहित्य न मिळाल्याने चोरी झाल्याची खात्री झाली.

चोरीस गेलेल्या सौर मोटार व केबलची एकूण किंमत १८ हजार ७२० रुपये इतकी असल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, तालुक्यात शेतातील सौर पंप, विद्युत साहित्य व कृषी उपकरणांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवून अशा चोऱ्यांना आळा घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये