गोंडपिपरीत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जनआक्रोश..!
सर्वपक्षीय विराट मोर्चाने केंद्र सरकारला धारेवर धरले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी गोंडपिपरी शहरात सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विराट निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ निघालेल्या या मोर्चात विद्यार्थी, महिला, युवक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शिवाजी चौकातून प्रारंभ झालेला मोर्चा गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला.

तहसील कार्यालय परिसरात झालेल्या सभेत विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला घटनात्मक अधिकार असल्याचे अधोरेखित करत विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत न्याय, पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मोर्चानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, ओबीसी कृती समितीसह विविध संघटनांच्या उपस्थितीमुळे हा मोर्चा गोंडपिपरीतील सर्वपक्षीय एकजुटीचे प्रतीक ठरला. संपूर्ण आंदोलन पोलिसांच्या चोख बंदोबस्तात शांततापूर्ण वातावरणात पार पडले.



