ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धान पिकावरील खोडकिडी-करपा रोगाचे संकट ; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्या

आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या; खोडकिडी व करपा रोगावरील औषधे मोफत उपलब्ध करून देण्याची आ. मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर – शेतकऱ्यांवर संकट ओढवले की सर्वप्रथम त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे नेतृत्व अशी ओळख असलेल्या आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर खोडकिडी व करपा रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटाची तातडीने दखल घेतली आहे. आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी संबंधित प्रशासनाला निर्देश देण्याची, पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तसेच खोडकिडी व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक कीटकनाशके व बुरशीनाशके कृषी विभागामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे उभे धान पीक वाचविण्यासाठी शासनाने या संकटाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणांना तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा, अशी आग्रही भूमिका आ. मुनगंटीवार यांनी घेतली आहे.

यासोबतच खोडकिडी व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक कीटकनाशके व बुरशीनाशके कृषी विभागामार्फत मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही आ.मुनगंटीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक खर्चातून धानाचे पीक उभे केले आहे. मात्र, ऐन हंगामात खोडकिडी व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. या किडी व रोगाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास धानाच्या उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी तसेच संबंधित कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देऊन खोडकिडी व करपा रोगामुळे नुकसान झालेल्या धान पिकाची गावनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निर्देश द्यावेत,अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. पंचनाम्याच्या आधारे नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित निकषांनुसार आर्थिक मदत देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

पुढील नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागामार्फत खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आवश्यक कीटकनाशके तसेच करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक बुरशीनाशके मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत. तसेच कृषी विभागाच्या पथकांनी गावनिहाय आणि प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांना औषधांचा योग्य वापर, फवारणीचे प्रमाण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्यापूर्वीच प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान केवळ आर्थिक स्वरूपाचे नसून त्यांच्या वर्षभराच्या कष्टावर आणि पुढील संपूर्ण हंगामाच्या आशेवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे, पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत, आवश्यक कीटकनाशके व बुरशीनाशके मोफत उपलब्ध करून देणे, गावनिहाय प्रत्यक्ष पाहणी आणि तांत्रिक मार्गदर्शन तसेच पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षांचे रक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीची मुख्यमंत्री स्तरावरून तातडीने दखल घेऊन आवश्यक निर्देश दिल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यासोबतच त्यांचे उभे पीक वाचविण्यासाठी प्रभावी उपाययोजनांना गती मिळेल, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये