बल्लारपूरच्या १ हजार घरकुलांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
चंद्रपूर म्हाडातील मंजूर २००४ घरकुलांचा आ. मुनगंटीवार यांनी घेतला आढावा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर म्हाडा परिसरातील रस्ते व मूलभूत सुविधांसाठी मुख्य अधिकारी डॉ. विजय इंगोले यांना निर्देश
चंद्रपूर : नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा), नागपूर येथे चंद्रपूर जिल्ह्यातील म्हाडाशी संबंधित विविध विषयांबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर आणि आवश्यक मूलभूत सुविधा मिळाव्यात, या संवेदनशील भूमिकेतून आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बल्लारपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार घरकुले उभारण्याबाबत चर्चा करून त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच चंद्रपूर येथील म्हाडा प्रकल्पातील यापूर्वी मंजूर झालेल्या २००४ घरकुलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. चंद्रपूर म्हाडा परिसरातील नागरिकांना रस्ते व इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी म्हाडाचे मुख्य अधिकारी डॉ. विजय इंगोले यांना आवश्यक निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. नवीन चंद्रपूर परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २००४ घरकुलांना यापूर्वीच मंजुरी मिळाली असून, या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला गती देण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. या बैठकीत या मंजूर घरकुलांच्या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेत पुढील कार्यवाहीबाबत निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.
दरम्यान, बल्लारपूर शहरातील गरजू व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार घरकुले उभारण्याच्या प्रस्तावाबाबतही बैठकीत चर्चा झाली. बल्लारपूरमधील घरकुलांची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आ. मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या घरांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे.
चंद्रपूर येथील म्हाडा परिसरात घरकुले उपलब्ध होत असतानाच तेथील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परिसरातील रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हाडाचे मुख्य अधिकारी डॉ. विजय इंगोले यांना आवश्यक निर्देश दिले. घरकुल प्रकल्पासोबतच त्या परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे, यासाठी रस्ते व मूलभूत सुविधांची कामे प्राधान्याने करण्यावर त्यांनी भर दिला.
चंद्रपूरच्या म्हाडा प्रकल्पातील २००४ घरकुलांचा लाभ पात्र व गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी लाभार्थी निवड व पुढील प्रक्रियेला गती मिळणे आवश्यक असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. घरकुल प्रकल्पाची अंमलबजावणी करताना पारदर्शकता, गतिमानता आणि पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य या बाबींवर बैठकीत त्यांनी विशेष भर दिला.
यापूर्वीही चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुलाच्या प्रश्नासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. नवीन चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणावर घरकुल प्रकल्प उभारण्याची संकल्पना पुढे नेत त्यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधला. त्यातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चंद्रपूर येथील २००४ घरकुलांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. आता या प्रकल्पाची पुढील कार्यवाही, तसेच बल्लारपूर येथील १ हजार घरकुलांचा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
गरजू कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळणे, हा केवळ निवाऱ्याचा विषय नसून त्यांच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुलांच्या प्रकल्पांना गती देतानाच संबंधित परिसरात रस्ते, पाणी, वीज आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर व बल्लारपूर येथील घरकुल प्रकल्पांना गती मिळून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.



