रुग्णांच्या सूचनांतून चंद्रपूरचे पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटल अधिक रुग्णाभिमुख करूया – आ. सुधीर मुनगंटीवार
कॅन्सर रुग्णांच्या हस्ते सूचनापेटीचे उद्घाटन; रुग्णांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा थेट प्रशासनापर्यंत पोहोचणार

चांदा ब्लास्ट
रुग्णांना उपचारांसोबत आपुलकी, विश्वास आणि नव्या आशेचा आधार मिळावा, यासाठी रुग्णालय अधिक संवेदनशील व रुग्णाभिमुख करण्यावर आ.मुनगंटीवार यांचा भर
चंद्रपूर : कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढताना रुग्ण केवळ उपचार घेत नसतो, तर त्याच्यासोबत त्याचे संपूर्ण कुटुंब चिंता, वेदना आणि असंख्य प्रश्न घेऊन रुग्णालयात येत असते. अशा वेळी रुग्णाला अत्याधुनिक उपचारांसोबत विश्वास, आपुलकी आणि आधाराचे वातावरण मिळावे, त्याच्या मनातील अडचणी आणि अपेक्षा समजून घेऊन रुग्णालयाच्या सेवेत सातत्याने सुधारणा व्हावी, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. याच भावनेतून चंद्रपूर येथील पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सूचनापेटीची सुविधा सुरू करण्यात आली असून, या सूचनापेटीचे उद्घाटन जिवती तालुक्यातील लांबबोरी येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण श्रीमती रुक्मिणीबाई आकृपी आणि श्री. शंकर आकृपी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यांच्याच हस्ते सूचनापेटीचे उद्घाटन होणे ही समाधानाची बाब असून, रुग्णांच्या सूचना आणि अनुभवातून चंद्रपूरचे पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटल अधिक सक्षम, संवेदनशील आणि रुग्णाभिमुख करण्याचा प्रयत्न असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
आ. मुनगंटीवार म्हणाले की, या सूचनापेटीच्या माध्यमातून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील सेवा, सुविधा, अडचणी तसेच आवश्यक सुधारणांबाबत आपल्या सूचना थेट मांडता येतील. या पेटीत केवळ तक्रारी नोंदवू नयेत, तर रुग्णालय अधिक चांगले कसे करता येईल, रुग्णांना आणखी कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील आणि उपचाराची प्रक्रिया अधिक सुलभ कशी करता येईल, याबाबतच्या योग्य सूचनाही द्याव्यात. रुग्णांच्या अनुभवातून मिळणारा अभिप्राय हा रुग्णालयाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा मार्गदर्शक ठरेल, असे आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी मुंबईसारख्या दूरच्या शहरांमध्ये जावे लागू नये, या उद्देशाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न करत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा आग्रह शासनाकडे धरला होता. 2014 मध्ये अर्थमंत्री झाल्यापासून त्यांनी या विषयाला सातत्याने प्राधान्य देत आवश्यक त्या स्तरावर प्रयत्न केले. खनिज विकास निधी आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून, चंद्रपूरमध्ये उभारलेले हे रुग्णालय पूर्व विदर्भातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. मात्र, हे रुग्णालय केवळ अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज राहू नये, तर राज्यातील एक आदर्श आणि रुग्णाभिमुख कॅन्सर उपचार केंद्र म्हणून नावारूपास यावे, यासाठीही आ. मुनगंटीवार यांची धडपड सुरू आहे. रुग्णांना सर्वोत्तम उपचार, सुलभ सेवा आणि आपुलकीचे वातावरण मिळावे, यासाठी रुग्णालयाच्या प्रत्येक बाबीकडे लक्ष देत त्यांचे प्रयत्न आणि सातत्यपूर्ण प्रयत्नशीलता कायम आहे.
कॅन्सरचे रुग्ण या रुग्णालयात येताना मनात चिंता आणि भीती घेऊन येतात; मात्र येथील अत्याधुनिक उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि आपुलकीच्या वातावरणामुळे उपचार घेऊन जाताना त्यांनी चिंतामुक्त, आत्मविश्वासाने आणि नव्या आशेने परतावे, अशा पद्धतीने या रुग्णालयाची कार्यपद्धती असावी, अशी अपेक्षा आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. रुग्णालयाची खरी ओळख केवळ अत्याधुनिक यंत्रसामग्रीने नव्हे, तर रुग्णाला मिळणाऱ्या दर्जेदार उपचार, विश्वासार्ह सेवा आणि आपुलकीच्या वातावरणातून निर्माण होते. त्यामुळे रुग्णांच्या प्रत्येक अनुभवाकडे गांभीर्याने पाहून आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा, असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.
या कॅन्सर रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग व्हावा, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. जीवनदायी योजनेअंतर्गत ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णांना मिळणारी आर्थिक मदत विलंब न होता तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. लकवा तसेच कॅन्सरसारख्या आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना शासनाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मदतीचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक असून, आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्यात आली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचेही लवकरच लोकार्पण होणार आहे. याशिवाय आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून बल्लारपूर येथे रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्यास एआय तंत्रज्ञानाचा वापर करून रोबोटिक सर्जरीसह उच्च दर्जाच्या उपचार सुविधा उपलब्ध करून देणारे उत्कृष्ट आणि आधुनिक रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने सुरू असलेले हे रुग्णालय समाजातील शेवटच्या पंक्तीत उभ्या असलेल्या वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारे उत्कृष्ट आरोग्यसेवा केंद्र म्हणून विकसित व्हावे, ही आपली भूमिका असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचारासोबत सन्मान, आधार आणि आश्वासक वातावरण मिळावे, यासाठी रुग्णांच्या सूचनांना महत्त्व देणे गरजेचे आहे. त्यामुळे ही सूचनापेटी केवळ तक्रारी नोंदविण्याचे माध्यम न राहता रुग्णांच्या मनातील आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविणारे आणि रुग्णालयाच्या सेवेला अधिक चांगली दिशा देणारे प्रभावी माध्यम ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, कॅन्सर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सच्या बांधकामासाठी आवश्यक जागेची पाहणी करण्यात आली. अधिकारी /कर्मचारी निवासस्थान, धर्मशाळा व परिचारिका निवासव्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याच्या सूचना संबंधितांना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.



