संत चावरा स्कूल, सालोड येथे महिला सुरक्षा, वाहतूक नियम आणि सायबर जनजागृतीवर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अविनाश नागदेवे
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, सुरक्षेची जाणीव आणि कायदा-सुव्यवस्थेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून संत चावरा स्कूल, सालोड येथे वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला सुरक्षा, वाहतूक नियम आणि सायबर अवेअरनेस (Cyber Awareness) या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस दलातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दामिनी पथका कडून महिला सुरक्षा बाबत मार्गदर्शन
दामिनी पथकच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) माधुरी वाघाडे यांनी महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना स्वतःची सुरक्षा, छेडछाड व पाठलाग यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी बाबत सविस्तर माहिती दिली तसेच आपत्कालीन परिस्थितीत महिलांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या “दामिनी पथक” आणि हेल्पलाइन क्रमांकांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कोणत्याही धोक्याच्या वेळी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याकरिता ११२ या हेलपलाईन क्रमांक वर कॉल करण्यास सांगितले
वाहतूक सुरक्षा आणि रस्ते अपघात नियंत्रणः
वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांनी रस्ते अपघात, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित वाहन चालवणे याविषयी मार्गदर्शन केले. “वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे केवळ कायद्याचे बंधन नसून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. विनापरवाना वाहन न चालवणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच अपघात झाल्यास १०८ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले.

सायबर गुन्हे व जनजागृती (Cyber Awareness):
सध्याच्या डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार दिनेश बोथकर यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, अनोळखी लिंक्स आणि ‘डिजिटल अरेस्ट’ किंवा आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव कसा करावा, याविषयी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. सायबर गुन्ह्यास बळी पडल्यास तत्काळ 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला त्यांनी दिला.

या कार्यशाळेला शाळेतील प्रिन्सिपल फादर हरिष जोश, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वाहतूक विभागाचे रियाज खान दामिनी पथकाच्या महिला पोलिस अंमलदार ममता निकोडे, पोलिस अंमलदार सुरज शुक्ल आणि 250 विद्यार्थी उपस्थित होते.



