३२४ शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटदार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित
राळापेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरातील फलश्रुती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील राळापेठ येथे शासनाच्या योजना थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवून प्रशासकीय कामांत सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरामध्ये ३२४ शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटदार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यात येऊन सर्व शेतकऱ्यांना सात_बारा चे वितरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, हाच या शिबिराचा उद्देश असून प्रशासनाने कोणतेही काम प्रलंबित न ठेवता जनतेच्या समस्यांचे जागीच निराकरण करून त्यांना जातीचे दाखले, सातबारा, उत्पन्न प्रमाणपत्र यासारखे अत्यावश्यक दाखले एकाच छताखाली दिल्यास नागरिकांची शासकीय दाखल्यांसाठी होणारी पायपीट थांबेल, त्यामुळे या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
भरगच्च नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समाधान शिबिराचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी केले तर उपविभागीय अधिकारी आनंद जाधव, तहसीलदार शुभम बहाकर, संवर्ग विकास अधिकारी संजय नैताम, महिला व बाल विकास अधिकारी लाडे, विस्तार अधिकारी जीवन प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, तालुका प्रशासनाच्या वतीने महिला व बालविकास, कृषी विभाग, सेतू शाखा, वन विभाग, पंचायत विभाग आदीं विभागांचे स्टॉल लावून नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार शुभम बहाकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तालुका परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.



