ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गौतम नगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

चांदा ब्लास्ट. प्रतिनिधी अतुल कोल्हे

भद्रावती :- शहरातील गौतम नगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजविणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर गुरुवारी (दि. 23) पहाटे सुमारे 3 वाजता पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भद्रावती वनविभागाने परिसरात पिंजरा आणि कॅमेरे बसवून सातत्याने गस्त सुरू ठेवली होती. नियोजनबद्ध मोहिमेद्वारे अखेर बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यात वनविभागाला यश आले.

दरम्यान, जेरबंद झालेला बिबट्या पाहण्यासाठी गौतम नगर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे काही काळ बिबट्या अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. मात्र, वनविभागाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. वनविभागाने बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचारांसाठी सुरक्षित ताब्यात ठेवले असून, त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्र सहाय्यक के. एन. गुगोलत यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये वनरक्षक संदीप पारवे, ललित नागपुरे, अनिल शेंद्रे, अमर किंनाके, नितीन राऊत, पवन मांढरे तसेच सर्पमित्र वैभव निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे, वनविभागाला सहकार्य करण्याचे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केल्याबद्दल भद्रावतीकरांकडून वनविभागाच्या पथकाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये