दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनांचे आज ब्रह्मपुरी बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी : दिल्ली येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या ब्रह्मपुरी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधींनी समर्थन जाहीर केले असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंददरम्यान दवाखाने व औषधांची दुकाने वगळता शहरातील सर्व छोटी-मोठी आस्थापने, व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, भाजीपाला बाजार, राईस मिल आदी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये आणि कामगार, व्यापारी व नागरिकांनी या बंदला प्रतिसाद देऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी ऐक्य व्यक्त करावे, असे आयोजकांनी म्हटले आहे.
बंदची सुरुवात सकाळी ६ वाजता होणार असून सकाळी ९ वाजता निषेध बाईक रॅली काढण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून क्रिस्टानंद चौक, ब्रह्मपुरी येथे सर्वपक्षीय निषेध व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



