NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर ब्रम्हपुरीत भाजप-काँग्रेस आमनेसामने
घोषणाबाजीने परिसर दणाणला, आज ब्रम्हपुरी बंदची हाक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुड्डेवार
ब्रम्हपुरी :- देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता ब्रम्हपुरीतही उमटू लागले आहेत. या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपचा निषेध मोर्चा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस कार्यालयावर धडकल्यानंतर भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भाजप युवा मोर्चाच्या शहर व तालुका स्तरावरील सुमारे ३० ते ४० कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयापासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवणे हा या मोर्चाचा प्रमुख उद्देश असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपचा मोर्चा काँग्रेस कार्यालयाजवळ पोहोचताच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयासमोर जमा झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत त्यांना ‘बेशरमाचे झाड’ भेट देण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण अधिकच तापले.
मोर्चादरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी “राहुल गांधी हाय-हाय!” अशा घोषणा देत राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी “चंदा चोर गद्दी छोड!” तसेच “पेपर लीक करणाऱ्या सरकारचा निषेध असो!” अशा घोषणा देत भाजपवर निशाणा साधला. या घोषणाबाजीमुळे परिसर काही काळ दणाणून गेला.
दोन्ही गट आक्रमक झाल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांनाही काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला.
दरम्यान, दिल्लीसह देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात येत असून, नुकतेच ‘इंडिया’ आघाडीच्या वतीनेही दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरीत भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेला हा संघर्ष शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या निषेधार्थ आज (दि. २३ जुलै) काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ब्रम्हपुरी बंदचे आयोजन करण्यात आले असून, या बंदला विविध संघटनांचा प्रतिसाद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



