ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वढोली शाळेतील शिक्षिकेची प्रतिनियुक्ती अखेर स्थगित

आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्तक्षेपाने वढोली शाळेची शिक्षक समस्या सुटली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी  राजेश डोंगरे

गोंडपिपरी :- तालुक्यातील वढोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरत असून, शाळेत केवळ पाच शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी दोन शिक्षक बीएलओच्या कामात व्यस्त असल्याने उर्वरित तीन शिक्षकांवर सात वर्गांचा शैक्षणिक भार पडत आहे. अशा परिस्थितीत गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षिका अलका गायकवाड यांची बोरगाव येथे प्रतिनियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी गोंडपिपरी पंचायत समितीत निवेदन देऊन प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर गोंडपिपरी येथे आयोजित आरोग्य शिबिरादरम्यान आमदार देवराव भोंगळे यांची भेट घेऊन त्यांनाही दि.२१ मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले.

मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार भोंगळे यांनी तातडीने गटशिक्षणाधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच शिक्षिका अलका गायकवाड यांची प्रतिनियुक्ती तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले. दि. २१ जुलै रोजी शिक्षिका अलका गायकवाड यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र,आमदारांच्या हस्तक्षेपानंतर हे आदेश स्थगित करण्यात आले. त्यामुळे वढोली येथील विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान टळले असून, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये