ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोरधरण मत्स्यव्यवसाय कंत्राटावरून पेटला संघर्ष; बहुजन समाज पार्टीचा ‘जनआक्रोश’ मोर्चा २२ जुलैला 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

बोरधरण तलावातील मत्स्यव्यवसाय कंत्राटावरून स्थानिक मच्छिमार आणि प्रशासन यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. ‘अमेय मल्टी सोल्युशन्स’ कंपनीला देण्यात आलेल्या वादग्रस्त कंत्राटाच्या विरोधात आणि स्थानिक मच्छिमारांच्या हक्कासाठी बहुजन समाज पार्टी व मच्छिमार संस्था आक्रमक झाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली स्थानिक मच्छिमारांच्या पोटावर पाय देण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, २२ जुलै रोजी सेलू ते बोरधरण असा भव्य मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बसपचे जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यानी दिला.

सेलू येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. “स्थानिक मत्स्यव्यवसायिकांच्या हक्कांना डावलून बाहेरील कंपनीला कंत्राट देणे, हे निव्वळ राजकीय हस्तक्षेप आणि दबावाचे राजकारण आहे. जनप्रतिनिधींनी आपल्या सत्तेचा वापर गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी करणे अपेक्षित होते, मात्र येथे उलट चित्र दिसत आहे,” असे म्हणत भैसारे यांनी सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडला आहे.

 ‘अमेय मल्टी सोल्युशन्स’ कंपनीचे कंत्राट तातडीने रद्द करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी.

  तलावातील मत्स्यव्यवसायाचे कंत्राट केवळ स्थानिक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनाच प्राधान्याने मिळावे.

 नवीन कंत्राटदाराने ७५ टक्के रोजगार स्थानिक मच्छिमार व मजुरांनाच देणे अनिवार्य करावे.

  कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार योग्य मोबदला मिळावा.

  मत्स्यव्यवसायात फोफावलेली गुंडगिरी आणि दादागिरी प्रशासनाने तत्काळ बंद करावी.

बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता सेलू बसस्थानकावरून या मोर्चाचा शुभारंभ होईल. हा मोर्चा विकास चौक, घोराड चौक, मोई आणि हिंगणी बाजार चौक मार्गे बोरधरण तलावाकडे कूच करणार आहे. बोरधरण येथे ठिय्या आंदोलन करून शासनाला जाब विचारला जाईल, असे भैसारे यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंदाताई नाखले, विधानसभा प्रभारी निखिल भगत, किशोर मेंढे, सुरेश दुधे, विशाल रंगारी, राकेश डायरे, महादेवराव बावने, विदर्भ महिला संघटक विद्याताई राइकवार आणि अनिता पारसे, किशोर खोब्रागडे यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक मच्छिमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न आता सामाजिक व राजकीय लढाई बनला असून, २२ जुलैच्या या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्ष यावर काय निर्णय घेतो आणि प्रशासन आंदोलनाची दखल घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.*तालुका प्रतिनिधी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये