सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला भद्रावतीतील विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पर्यावरणवादी व समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी भद्रावतीतील विविध सामाजिक, पत्रकार, विद्यार्थी व राजकीय संघटनांनी एकत्र येत जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी केंद्र सरकारच्या कथित विद्यार्थीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विद्यार्थी संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत केंद्र शासनाच्या विद्यार्थीविरोधी धोरणांवर टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविले.
याशिवाय भद्रावती तालुका पत्रकार असोसिएशन,भांदक प्रेस क्लब तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनेही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास समर्थन देत निवेदने सादर करण्यात आली.
या आंदोलनात नगराध्यक्ष प्रफुल चटकी, दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, लिमेश माणूसमारे, के. एस. रावळे, सुनील बिपटे, सुनील पतरंगे,अतुल कोल्हे, भाकपचे कॉ. राजू गैनवार, अरविंद कॅप्टन, श्रीराम पिदुरकर, निशांत मेश्राम, शकील शेख, प्रदीप मांदाडे, विद्यार्थी संघटनेचे आशिष देहारकर, फरहान शेख, डॉ. अमित नगराळे, डॉ. निदा, दिलीप वानखेडे, भुपेश कायरकर, जाफर शेख, इमरान शेख, सुयोग भोयर, कुशल मेश्राम, सुरज शाहा यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, महिला, बुद्धिजीवी व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाद्वारे पर्यावरण संरक्षण, विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न आणि लोकशाही मार्गाने मांडण्यात आलेल्या मागण्यांकडे केंद्र शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.



