पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचवा – आ.विजय वडेट्टीवार
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारामवार
सावली पंचायत समितीच्या द्विवार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विभागांचा आढावा
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत वेळेत आणि पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे. लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी संबंधित विभागांनी अधिक जबाबदारीने काम करावे. योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले.
सावली पंचायत समितीच्या वतीने रुबाबदार सभागृह येथे आयोजित द्विवार्षिक सर्वसाधारण सभेत राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषी, समाजकल्याण, महिला व बालविकास, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन आदी विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. विविध गावांतील नागरिकांनी स्थानिक समस्या, अडचणी सभागृहात मांडल्या.
यावेळी आ. वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून विभागनिहाय माहिती घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शासन जनतेच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत असले तरी प्रशासकीय दिरंगाई व समन्वयाच्या अभावामुळे अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक अधिकाऱ्याने लोकाभिमुख आणि जबाबदारीची भूमिका स्वीकारून काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पात्र लाभार्थी कोणत्याही कारणाने वंचित राहू नयेत, यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
सभेदरम्यान विविध गावांतील पाणीपुरवठा, रस्ते, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा, कृषीविषयक अडचणी तसेच अन्य प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा झाली. संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आ. वडेट्टीवार यांनी दिला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी कल्पना क्षीरसागर (पंचायत), उपविभागीय अधिकारी अजय चरडे,तहसीलदार प्रांजली चिरडे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार, पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे,नगराध्यक्ष साधना वाढई,उषाताई भोयर,माजी सभापती विजय कोरेवार, कृष्णा राऊत,पुरुषोत्तम चुदरी,किशोर कारडे, अंकुश शेंडे,तसेच विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, प्रशासक उपस्थित होते.



