ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

येत्या गणेशोत्सवासाठी भद्रावतीत मूर्तिकारांची लगबग

कुंभारी समाजाची निर्जीव मातीला आकार, सौंदर्य व जिवंतपणा देण्याची कला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          निर्जीव मातीला आकार, सौंदर्य आणि जिवंतपणा देण्याची परंपरागत कला भद्रावतीच्या कुंभारी समाजाने पिढ्यानपिढ्या जपली आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याची वैशिष्ट्यपूर्ण हातोटी असलेल्या या कलाकारांना मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित व्यासपीठ मिळालेले नाही. त्यामुळे एवढी समृद्ध कला आजही प्रामुख्याने उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनच मर्यादित राहिली आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीकारांच्या कामाला वेग आला आहे. मूर्तिकार सतीश विठ्ठल वाणी हे मूकबधिर असूनही त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कलागुणांची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्यासह प्रभाकरजी बोरसरे, मनोज खोबरे, दिलीप खांदारे, अशोक वाणी, मनोज बोरसरे, सतीश बोरसरे, बाळू पातर आणि दीपक खांदारे हे मूर्तिकार आजही कुंभारी कलेची परंपरा पुढे नेत आहेत.

मातीच्या साध्या गोळ्याला कलात्मक आकार देत डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सुबक मूर्ती साकारण्याचे कसब या कलाकारांकडे आहे. विशेष म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या मूर्तींची निर्मिती करण्यावरही त्यांचा भर आहे.

पुणे-मुंबईसारख्या महानगरांत हीच कला पोहोचली असती, तर या कलाकारांना मोठे व्यासपीठ, प्रसिद्धी आणि व्यावसायिक संधी मिळाल्या असत्या. मात्र भद्रावतीच्या मातीत राहून परिस्थितीशी दोन हात करत हे कलाकार आपला पारंपरिक कौटुंबिक व्यवसाय आणि सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवत आहेत.

स्थानिक पातळीवर मर्यादित राहिलेल्या या कलेला शासन, सांस्कृतिक संस्था आणि कला क्षेत्रातील जाणकारांनी व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये