ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गनेरी जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!

पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालय गायब; संरक्षक भिंतीअभावी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील पंचायत समिती जिवती अंतर्गत येणाऱ्या गनेरी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. शाळेत पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही, शौचालयाची सुविधाही उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच शाळेच्या वर्गखोल्यांना गळती लागल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गनेरी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरतात. मात्र, या शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा नसल्याचे चित्र आहे. शौचालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह विशेषतः विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छता, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांशी संबंधित सुविधांची ही अवस्था चिंताजनक असल्याचे पालक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

*निधी मंजूर, तरी पाण्याची सुविधा नाही?*

विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना पाण्याची सुविधा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे मंजूर निधीचा विनियोग नेमका कुठे आणि कशा पद्धतीने झाला, याची चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे.

*दोन तालुक्यांच्या कात्रीत गनेरी*

गनेरी गाव जिवती तालुक्यात येत असून, येथील शैक्षणिक सुविधांची जबाबदारी पंचायत समिती जिवतीच्या माध्यमातून पार पाडली जाते. मात्र, प्रशासकीयदृष्ट्या हे गाव राजुरा तालुक्यातील कावडगोंदी ग्रामपंचायतीअंतर्गत येते. त्यामुळे गावातील विकासकामे आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत गनेरी गाव दोन तालुक्यांच्या कात्रीत सापडल्याचे चित्र आहे. या प्रशासकीय गुंतागुंतीचा फटका आता थेट विद्यार्थ्यांना बसत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

*संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात*

शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शाळेच्या परिसराला सुरक्षित कुंपण नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय वर्गखोल्यांच्या छताला गळती लागल्याने पावसाळ्यात वर्गात बसणेही विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.

शाळेतील पिण्याचे पाणी, शौचालय, संरक्षक भिंत आणि वर्गखोल्यांची दुरुस्ती या चारही प्रमुख बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करून तातडीने कामे सुरू करावीत, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

गनेरीतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न केवळ शाळेपुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेच्या वास्तवाचे दर्शन घडवणारा आहे. त्यामुळे प्रशासन आता तरी जागे होणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये