मुस्लिम महिलांनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधली राखी
रक्षाबंधनातून सामाजिक ऐक्याचा दिला संदेश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त मुस्लिम महिलांनी आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधून बंधुभावाच्या नात्याला नवी उंची दिली. धर्माच्या सीमा ओलांडून स्नेह, विश्वास आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हा भावनिक क्षण यावेळी अनुभवायला मिळाला.
मुस्लिम महिलांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे औक्षण करून त्यांच्या हातावर राखी बांधली. यावेळी आमदार जोरगेवार यांनीही या प्रेमळ भावनेचा स्वीकार करत उपस्थित महिलांशी आपुलकीने संवाद साधला. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून समाजातील विविध घटकांना प्रेमाच्या आणि विश्वासाच्या धाग्याने जोडणारा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूरची सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख ही विविधतेतील एकतेची राहिली आहे. विविध धर्म, जाती आणि समाजघटकांनी परस्पर सन्मान व बंधुभाव जपत एकत्र येणे हीच शहराची खरी ताकद आहे. मुस्लिम महिलांनी राखी बांधून दिलेले प्रेम आणि आशीर्वाद ही आपल्यासाठी मोठी भावनिक ठेव असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी उपस्थित महिलांनीही आमदार जोरगेवार यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पार पडलेल्या या उपक्रमातून ‘धर्म वेगळे असले तरी माणुसकीचे नाते एकच’ असा सुंदर संदेश चंद्रपूरकरांना मिळाला..



