बालचित्रकला स्पर्धेत मिताली कुडमेथेची जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाची भरारी!
गोंडपिपरी तालुक्यातील एकमेव विद्यार्थिनीला पुरस्कार ; शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित बालचित्रकला स्पर्धेत गोंडपिपरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. मिताली सुरेश कुडमेथे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावत तिने आपल्या कलागुणांची छाप उमटवली. विशेष म्हणजे, गोंडपिपरी तालुक्यातून या स्पर्धेत पुरस्कार प्राप्त करणारी ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
मितालीने आपल्या कल्पकतेतून आणि कलात्मक कौशल्यातून आकर्षक कलाकृती साकारली. तिच्या या यशामुळे शाळेसह गोंडपिपरी तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बालवयातच चित्रकलेची आवड जोपासत तिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि कलेविषयी आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने अशा स्पर्धांचे महत्त्व मोठे आहे. मितालीच्या यशाने विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच कला क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
मितालीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंदांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या यशामागे असलेली मेहनत, जिद्द आणि कलात्मक दृष्टिकोन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोंडपिपरी तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल करणाऱ्या मिताली कुडमेथेच्या या यशामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक आणि कलात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.



