ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील 4 लक्ष 90 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : बालकांचे आरोग्य व पोषणस्थिती सुधारण्यासोबतच कृमी संसर्गाचे प्रमाण कमी करून बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास साधण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात 27 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम आणि 3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा कृतीदल समितीची बैठक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनावणे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.स्नेहल कासारे उपस्थित होते.

राष्ट्रीय जंतनाशक दिन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भाग तसेच चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 4 लाख 89 हजार 926 पात्र लाभार्थ्यांना जंतनाशक औषध देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 3 लाख 55 हजार 995, शहरी भागातील 52 हजार 487 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 81 हजार 444 लाभार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व 15 तालुके तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना देण्यात येणार आहे.

शासकीय, शासकीय अनुदानित, खासगी शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जंतनाशक औषध देण्यात येईल. शाळाबाह्य बालकांपर्यंतही या मोहिमेचा लाभ पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून कार्यवाही करण्यात येणार आहे.

मोहिमेसाठी आवश्यक एकूण 11 लाख 41 हजार अल्बेंडाझोल औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य सेवक व सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. लाभार्थ्यांची यादी अद्ययावत ठेवणे, औषध सेवनाची नोंद घेणे, मोहिमेचा दैनंदिन अहवाल सादर करणे आणि औषध सेवनापासून वंचित राहिलेल्या पात्र बालकांना मॉप-अप दिनी औषध देणे याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या सूचना : 27 ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र बालकांना 3 नोव्हेंबर 2026 रोजी मॉप-अप दिनी गोळी देण्यात येईल. गोळी देताना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. गोळी दिल्यानंतर बालकास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. गोळी दिल्यानंतर मळमळ, उलटी, पोटदुखी किंवा अन्य त्रास जाणवल्यास संबंधित आरोग्य कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आजारी असलेल्या बालकांना जंतनाशक औषध देण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.

जिल्ह्यातील सर्व पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित विभागांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून एकही पात्र बालक जंतनाशक औषधाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये